Fri, Jul 19, 2019 15:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाडजवळ तीन अपघातात 6 जण जखमी 

महाडजवळ तीन अपघातात 6 जण जखमी 

Published On: Jun 05 2018 11:00AM | Last Updated: Jun 05 2018 11:05AMमहाड : प्रतिनिधी  

काल मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती महाड शहर पोलिस ठाण्याकडून देण्यात आली. 

महाड शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर दासगावच्या हद्दीत दोन अपघात घडले. पहिल्या अपघातात रात्री बाराच्या सुमारास बोरिवली-देवगड या बसला टँकरने धडक दिली. मात्र सुदैवाने गाडीमध्ये कमी प्रवासी असल्याने आणि चालकाने दाखविलेल्या हुशारीमुळे मोठा अपघात टळला. यामध्ये प्रवाशी कोणीही जखमी झाले नसून एसटीचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. 

या घटनेनंतर रात्री दीडच्या सुमारास काफिला बंदर येथे एका कंटेनरचा अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या मध्यभागी अचानक उभी राहिली, मात्र सुदैवाने यावेळी महामार्गावर वाहनांची जास्त संख्या नसल्याने जीवित वा वित्तहानी झाली नाही.

तर पहाटे साडेतीनच्या सुमारास महाड वाहतूक पोलिस ठाणे गांधार पाले येथे झालेल्या तिसऱ्या अपघातात कोकणातून शहापूरकडे निघालेल्या कारला झालेल्या अपघातात गाडीमधील सहा जण जखमी झाले. त्यांना तातडीने मुंबई येथे हलवण्यात आले आहे अशी माहिती शहर पोलिस ठाण्याकडून देण्यात आली. या चारचाकीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी राष्ट्रीय महामार्गावरील संरक्षक कठड्यांवर जाऊन आदळली. या वाहनातून गाडीमधील प्रवास करणारे चालक दीपक टके्कर हे गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली असून त्यांच्याबरोबर प्रवास करणारे राजेंद्र द्वारकानाथ जगे, राजश्री राजेंद्र जगे, हर्षल राजेंद्र जगे, कोमल राजेंद्र जगे, राजन दत्तात्रय भूपतराव हे सर्व किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने मुंबई येथे हलविण्यात आले आहे.