Wed, Apr 24, 2019 15:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गणेश नाईकांची पदाधिकार्‍यांसह नगरसेवकांना तंबी!

गणेश नाईकांची पदाधिकार्‍यांसह नगरसेवकांना तंबी!

Published On: Mar 12 2018 10:55AM | Last Updated: Mar 12 2018 10:55AMनवी मुंबई ः प्रतिनिधी

आपण भाजपच्या मार्गावर नाही, आपल्याबाबत वावड्या उठवल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे धोरण ज्यांना मान्य नसेल त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडावे, ज्यांना माझे नेतृत्त्व मान्य नसेल, त्यांना  बाहेरचा मार्ग मोकळा आहे. असे स्पष्ट शब्दांत माजी मंत्री व नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी पदाधिकार्‍यांसह नगरसेवकांना तंबी दिली. 

माजी मंत्री गणेश नाईक यांनी पक्षविरोधी  छुप्या कारवाया, भूमिका घेणार्‍या पदाधिकारी आणि नगरसेवकांना चांगलाच घाम फोडला. आत्तापर्यंत नाईकांनी घेतलेल्या मेळाव्यात दुसर्‍यांदा पदाधिकारी व नगरसेवकांना पटत नसेल तर  स्वइच्छेने निघून जाण्याचा इशारा दिला. मात्र, पक्षात राहून वेगळीच चूल मांडण्याची किंवा भूमिका घेण्याची हिंमत कुणीही करु नये, असा सज्जड दमही भरला. याचे कारण म्हणजे, मधल्या काळात  राष्ट्रवादीचे काही नगरसेवक भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या गौरव निवासस्थानी फिरकत होते.

एवढेच नाही तर त्यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रालयात जाऊन ज्येष्ठ मंत्र्यांशी वेगवेगळ्या विषयांवर  भेटीगाठी घेतल्या. त्यातून ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. तर शिवसेनेचे सध्या चर्चेत असलेले नगरसेवक किशोर पाटकर यांच्यासोबत सोशल मिडीयावर पडलेले  राष्ट्रवादी नगरसेवकांचे फोटोही चर्चेचा विषय झाला होता. या सर्व विषयांवर हात घालत कुणाचेही नाव न घेता ज्यांना नेतृत्त्व मान्य नसेल त्यांना मार्ग मोकळा असल्याचा इशारा  यावेळी त्यांनी दिला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रविवारी वाशी येथील विष्णूदास भावे नाटयगृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना गणेश नाईक बोलत होते. ‘वन बुथ,टेन युथ’ ही संकल्पना मांडून  केवळ निवडणुकीपुरते नव्हे तर नियमितपणे त्या-त्या बुथमधील नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या सुखदुःखाशी समरस होवून त्यांच्या अडीअडचणी सोडवा, अशी सूचनाही राष्ट्रवादीच्या युवकांना  त्यांनी केली. कधी कधी नालायक माणसे देखील पदावर जातात. त्यांचे समर्थन समाजहितासाठी करता कामा नये, असे मत त्यांनी मांडले.

युवकांनी मेळाव्यास तुफान गर्दी केली  होती. नाटयगृहातील स्टॉल, बाल्कनी मधल्या उपलब्ध जागेत खाली बसले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव नाईक, आ.संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक,  सुधाकर सोनावणे, माजी स्थायी  समिती सभापती सुरेश कुलकर्णी, महापौर जयवंत  सुतार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सुरज पाटील यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.  दुसर्‍यांची मने  दुखावणारा धर्म कधीच नसतो असे सांगून दुर्गुणांचा सन्मान करु नका.  त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो, असा सल्ला त्यांनी दिला. नवी मुंबई राष्ट्रवादीच्या  सर्व सेलच्या कार्यकर्त्यांचे शिबीर वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्राच्या प्रशस्त जागेत भरविण्यात येईल, अशी घोषणा नाईक यांनी केली. 


मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच - गणेश नाईक

कार्यकर्ता मेळाव्यानंतर प्रसिध्दी माध्यमांनी गणेश नाईक यांच्याशी संवाद साधला असता पक्षांतराच्या चर्चाविषयी विचारले असता ते म्हणाले की शरद पवार यांचे नेतृत्व अष्टपैलू, चतुरस्त्र असून  त्यांच्या विचारांशी मी समरस आहे. यापूर्वी देखील मी स्पष्ट केलेले आहे की मी राष्ट्रवादीमध्ये राहणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कॉग्रेसशी युती होण्याची काही शक्यता आहे काय? या  विषयी विचारले असता समविचारी पक्षांची आघाडी होईल, असे संकेत शरद पवार यांच्याकडून अलिकडेच जाहीरपणे मिळतात, असे उत्तर त्यांनी दिले.