होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीचा खून

अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीचा खून

Published On: Jan 08 2018 1:27AM | Last Updated: Jan 08 2018 12:43AM

बुकमार्क करा




भिवंडी : वार्ताहर 

अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीचा 24 वर्षीय प्रियकराच्या साथीने राहत्या घरात अत्यंत निर्दयीपणे मुंडके धडावेगळे करून खून केल्याची धक्कादायक घटना नागाव परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. कैफ उर्फ मनोजकुमार ऊर्फ राहूल जगदीशप्रसाद सोनी (30) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीसांत प्रियकर रिजवान मोहम्मद कुरेशी (24 रा. कसाईवाडा), पत्नी गुलशबा सोनी (28) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्येनंतर दोघेही फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत कैफ उर्फ मनोजकुमार सोनी याचा प्रेमविवाह गुलशबा हिच्याशी 4 वर्षापूर्वी झाला होता. त्याने गुलशबा हिच्याशी लग्न करण्यासाठी धर्मांतर केले होते. मृत मनोजकुमार हा गुलशबा व 3 मुलांसोबत नागाव परिसरातील विठ्ठल निवास इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर राहत होता. तो आग्रा येथे कटलरी सामान विक्रीचे काम करीत असल्याने दीड ते 2 महिन्यांनी घरी येत असे. 3 जानेवारी रोजी तो घरी आला असता त्याने पत्नीला रिजवानसोबत अश्लील चाळे करताना पाहिले. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

आपल्या अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत आहे असे वाटू लागल्याने पत्नी गुलशबा व प्रियकर रिजवान या दोघांनी संगनमत करून मनोजकुमार याचा धारदार शस्त्राने डोके धडावेगळे करून मृतदेह घरातच टाकून फरार झाले. प्रेयसीसोबत फरार झालेल्या रिजवानने नातेवाईक शाबादला संपर्क करून घटनेची माहिती देवून यातून मार्ग काढण्यास सांगितले. मात्र शाबाद कुरेशी याने या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ शांतीनगर पोलिसांना माहिती दिली. 

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर जाधव व पोलीस निरिक्षक मनजितसिंग बग्गा यांनी आपल्या पथकासह धाव घेवून मृतदेह ताब्यात घेतला. चार दिवसांपूर्वी त्याचा खून करण्यात आला असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी गुलशबा हिच्यावर संशय व्यक्त केला असून तिच्यासह प्रियकर रिजवान मोहम्मद कुरेशी अशा दोघांविरूध्द शांतीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.