Fri, Apr 26, 2019 01:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पतीचे शीर पाच दिवसांनी सापडले

पतीचे शीर पाच दिवसांनी सापडले

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 1:04AMडोंबिवली : वार्ताहर

पतीच्या हत्येसाठी 30 लाखांची सुपारी देवून पत्नीने हत्याकांड घडवून आणल्याप्रकरणी अत्यंत क्रूर पद्धतीने शंकर गायकवाड  यांचे शीर व दोन्ही हात धडावेगळे करण्यात आल्याची धक्कादायक माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीतून उघड झाली आहे. 1 जून रोजी अर्धवट गाडलेला मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांचे दोन्ही हात व शीर शोधण्याच्या तपासालाही वेग दिला. त्यानंतर तब्बल 5 दिवसांनी पतीचे धडावेगळे केलेले शीर पोलिसांना एक किलोमीटर अंतरावरील जंगलात आढळून आले.

कोळसेवाडी पोलिसांनी आतापर्यंत या गुन्हातील दोघांना अटक केली असली तरी यातील चार आरोपी अद्यापही फरार आहे. तिसगाव येथील श्री सद‍्गुरु कृपा इमारतीत राहणारे शंकर बारकू गायकवाड हे 18 मे रोजी रात्री दीडच्या सुमारास देवदर्शनासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडले तेव्हापासून ते बेपत्ता झाले होते. पत्नी आशा हिने तीन दिवसानंतर पती बेपत्ता झाल्याचा कांगावा करून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

वास्तविक ज्या रात्री शंकर बेपत्ता झाले, त्याच रात्री त्यांना गुंगीचे औषध पाजून रिक्षातून अपहरण करण्यात आले. प्रवासादरम्यान पत्नी आशा ही एका धाब्याजवळ उतरली. तर आरोपी जगन कोरी आणि राहुल म्हात्रे बेशुद्धावस्थेत असलेल्या शंकर यांना धरुन बसले. आरोपी प्रितम हा रिक्षा चालवत होता.बदलापूर दरम्यान रेल्वे पटरीलगत शंकर यांना रिक्षातून उतरवले. तोपर्यंत हत्येची सुपारी घेणारा आरोपी हिमांशू दुबे हा त्याच्या यामाहा दुचाकीवरून तेथे पोहोचला होता. प्रितम याने डोक्यात स्टंपचे फटके मारले, तर जगन कोरी याने धारदार शस्त्राने गळा आणि दोन्ही हात कापून धडावेगळे केले. त्यानंतर सर्वांनी मृतदेह उचलून जवळच असलेल्या खड्ड्यात अर्धवट अवस्थेत गाडला. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कवयित्री गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपासचक्रांना वेग देऊन 1 जूनला संशयित आरोपी हिमांशू दुबे याला सकाळी, तर शंकर यांची पत्नी आशा हिला ताब्यात घेतले. या दोघांनी दिलेल्या कबूलीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शंकर यांचा पूर्णतः सडलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रूग्णालयात पाठविला.