Tue, Apr 23, 2019 07:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडुपमध्ये पतीनेच चिरला पत्नीचा गळा

भांडुपमध्ये पतीनेच चिरला पत्नीचा गळा

Published On: May 05 2018 1:22AM | Last Updated: May 05 2018 12:59AMभांडुप : वार्ताहर

भांडुपच्या तुलशेतपाडा विभागात एका तरुणाने थंड डोक्याने पत्नीचा खून करुन, चोराने पत्नीची हत्या केल्याचा बनाव रचल्याची घटना शुक्रवार (दि. 04) रोजी पहाटे उघडकीस आली. नेहा गुप्ता(27) असे मृत पत्नीचे नाव असून बिरबल रामकुमार गुप्ता(32) असे पतीचे नाव आहे. 

नेहा आणि बिरबल यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्यांना तीन मुली आहेत. त्यापैकी एक पाच वर्षांची, एक तीन वर्षाची, तर एक दीड महिन्याची आहे. बिरबलची मोटार असून तो ती खासगी प्रवासी वाहतूक कंपनीसाठी स्वतःच चालवतो. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणांवरून भांडणे होत होती. पत्नीच्या बहिणीचे लग्न असल्याने पैशांच्या विषयावरुन त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. याच रागातून बिरबलने शुक्रवारी पहाटे भाजी चिरण्याच्या चाकूने पत्नीचा गळा चिरला. सकाळी घरात चोर शिरले आणि त्यांनी पत्नीची हत्या केल्याची आरडाओरड केली. घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून ठेवले. आपण रात्री कुठेतरी बाहेर गेल्याचे त्याने आजूबाजूच्या लोकांना सांगितले. नेहाचे हात पाय बांधून तिच्या हातावर आणि गळ्यावर वार करण्यात आले होते. सकाळी जखमी अवस्थेत तिला मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

भांडुप पोलिसांनी त्यांच्या मुलींना विचारले असता मुलींनी बापाने आईला मारल्याचे सांगितले. तसेच आरोपी भांडुपमध्येच असल्याचे मोबाईल लोकेशनमधूनही सिद्ध झाले. भांडुप पोलिसांनी बिरबलला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे तीन लहान मुली पोरक्या झाल्या आहेत. त्यामुळे भांडुप च्या तुलशेत पाडामध्ये संतापबरोबर हळहळही व्यक्त केली जात आहे.

Tags : Mumbai, husband, kills, wife