होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात विवाहितेची पतीकडून हत्या

ठाण्यात विवाहितेची पतीकडून हत्या

Published On: Apr 18 2018 2:01AM | Last Updated: Apr 18 2018 1:04AMठाणे : प्रतिनिधी

शालेय प्रवेशासाठी मुलीची प्रमाणपत्रे घेण्यासाठी सासरी आलेल्या सुनेवर रॉकेल ओतून सासूने व पतीने तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील रघुनाथनगर येथे काही दिवसांपूर्वीच घडलेली असतानाच ठाण्यात आणखी एका 20 वर्षीय विवाहितेची गळा दाबून पतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही हत्या 9 एप्रिल रोजी करण्यात आली असून पत्नीची हत्या केल्यानंतर नराधम पती तिचा मृतदेह घरात बंद करून फरार झाला. या घटनेप्रकरणी 16 एप्रिल रोजी रात्री श्रीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला. 

प्रियंका राधेश्याम चौधरी (20) असे मृत विवाहितेचे नाव असून ती पती राधेश्याम लल्लू चौधरी (24) याच्यासह महालक्ष्मी चाळ, रुपादेवी टेकडी, इंदिरानगर, वागळे स्टेट येथे राहत होती. राधेश्याम हा नोकरी करतो तर प्रियंका देखील नोकरी करत होती. प्रियंका व राधेश्याम यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेले असून राधेश्याम हा सतत प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत. दरम्यान, 9 एप्रिल रोजी रात्री 10च्या सुमारास देखील राधेश्याम याने प्रियंकावर संशय घेत तिला मारहाण केली. या मारहाणीत आरोपी राधेश्याम याने पत्नी प्रियंकाचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घरात बंद करून बाहेरून दरवाज्यास कुलूप लावून तो घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

Tags : Mumbai,  husband killed,  his wife, Mumbai news,