होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चहा मागितला म्हणून पत्नीने पतीस भोसकले

चहा मागितला म्हणून पत्नीने पतीस भोसकले

Published On: Mar 14 2018 1:25AM | Last Updated: Mar 14 2018 1:22AMठाणे : प्रतिनिधी

कामावर जाण्यास उशीर होत असल्याने मला लवकर चहा दे असे पतीने सांगताच पत्नीचा राग अनावर होवून तिने भाजी कापण्याच्या चाकूने पतीस भोसकल्याची घटना चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीनंतर पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्मवीर नगरातील अशोका सोसायटीत बिल्डिंग नंबर 2 आणि रूम नंबर 304 मध्ये राहणारे राहुल गरुड (37) हे फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. राहुल यांच्यासोबत त्यांचा 10 वर्षाचा मुलगा व पत्नी अश्विनी (31) राहतात. दरम्यान, 11 मार्च रोजी सकाळी कामावर जाण्यास उशीर होत असल्याने राहुल यांनी पत्नी अश्विनीला लवकर चहा दे, असे सांगितले. याचा राग आल्याने अश्विनी हिने राहुल यांना मी चहा देणार नाही असे सांगत बडबड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राहुल हे, नाही द्यायचा तर राहू दे असे सांगत घरातून बाहेर जावू लागले.

यावेळी रागाच्या भरात अश्विनीने किचनमधून भाजी कापण्याचा चाकू आणून राहुलच्या खांद्यावर वार केला. या घटनेत राहुल जखमी झाले व त्यांनी सरळ चितळसर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी राहुल यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांची तक्रार दाखल करून घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अश्विनी गरुड हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गरुड दाम्पत्यात कौटुंबिक वाद असून अश्विनी हिने 2014 साली राहुल विरोधात ठाणे कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र त्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले होते.