होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवरा-बायकोमधील भांडण सोडवणे पडले महागात

नवरा-बायकोमधील भांडण सोडवणे पडले महागात

Published On: Mar 20 2018 1:49AM | Last Updated: Mar 20 2018 1:17AMठाणे : प्रतिनिधी

घरगुती कारणातून वाद होत असलेल्या दाम्पत्यास समजवण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीवरच वाद करणार्‍या पतीने चाकूने हल्ला करत त्यास गंभीर जखमी केल्याची घटना वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दोस्ती रेंटल बिल्डिंग येथे घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील मानपाडा येथे राहणार्‍या झोया शेख (30) या त्यांच्या पतीसह राहतात. झोया व त्यांचे पती बर्थडे कार्यक्रमाचे डेकोरेशन करण्याचे काम करतात. दरम्यान, झोया व त्यांचे पती शाहरुख शेख यांच्या ओळखीचे साहिल उर्फ नदीम (27) हा व्यक्ती दोस्ती रेंटल बिल्डिंगमध्ये राहतो. साहिल व त्याच्या पत्नीत नेहमीच वाद होत असतात. 15 मार्च रोजीही साहिल व त्याच्या पत्नीत वाद झाला होता. याच वादातून साहिलची पत्नी घरातून निघून गेली होती. त्यावेळी झोया आणि शाहरुखने साहिल व त्याच्या पत्नीस समजावून सांगत दोघांचा वाद मिटवला होता.

त्यानंतर 16 मार्च रोजी साहिलने शाहरुख यास फोन करून तू माझ्या पत्नीस तुझ्या घरी घेऊन बसला आहेस असे सांगत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर झोया आणि शाहरुख यांनी साहिल यास समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही साहिल हा शिवीगाळ करतच होता.

त्यानंतर 17 मार्च रोजी रात्री 1.30 च्या सुमारास झोया आणि शाहरुख साहिल यास समजवण्यास त्याच्या बिल्डिंग खाली गेले. यावेळी साहिल याने पाठीमागून येत शाहरुखच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार केले. तसेच शाहरुख यास खाली पाडून त्याच्या पोटात चाकूने वार केला. यावेळी झोया जोरजोरात मदतीसाठी ओरडत असतांना साहिल याने तिलाही मारहाण केली व घटनास्थळावरून फरार झाला. 

जखमी शाहरुख यास सावरकर नगर येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी झोया शेख यांनी दिलेल्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार साहिल उर्फ नदीम याचा शोध सुरु केला आहे.

Tegs : husband wife dispute, To solve, Fell, expensive,