Mon, Jan 21, 2019 17:19



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली : अजस्त्र नाग पाहून उडाली भंबेरी

डोंबिवली : अजस्त्र नाग पाहून उडाली भंबेरी

Published On: Mar 17 2018 11:26PM | Last Updated: Mar 17 2018 11:26PM



डोंबिवली : बजरंग वाळुंज

कल्याणच्या डम्पिंगला ग्रांऊडला लागलेल्या भीषण आगीमुळे येथील रहिवाशांसह सरपटणाऱ्या प्राण्यांनाही धुरकोंडी व आगीच्या झळांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून डम्पिंग परिसरात वास्तव करणाऱ्या सापांनी मानवी वस्तीत शिरकाव केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शनिवारी सायंकाळच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील गांधारी गावात एका घराबाहेर अजस्त्र नाग आढळून आल्याने परिसरातील कुटुंबियांना घामच फुटला. 

कल्याणच्या पश्चिमेकडील गांधारी गावातल्या हनुमान मंदिर परिसरात सूर्यकांत कारभारी यांचे घर आहे. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांना अजस्त्र नाग घराबाहेर सळसळत फुस्कारे मारताना दिसला. मोठा नाग गावात शिरल्याची बातमी पसरताच गावकऱ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. काही जणांनी सर्पमित्र ज्ञानेश्वर सुतार याला फोन करून नाग गावात घुसल्याची माहिती दिली. 
ज्ञानेश्वर याने घटनास्थळी येऊन शोधाशोध केली असता, घराच्या मागील बाजूस गटारीत नाग लपून बसल्याचे दिसले.  ज्ञानेश्वरने मोठ्या प्रयत्नाने या नागाला पकडून सोबत आणलेल्या गोणीत घातले. त्यामुळे कारभारी कुटुंबियांसह उपस्थित गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या नागाने दंश केल्यास मनुष्य वा जनावर तत्काळ गतप्राण होऊ शकते. पकडलेला नाग हा कोब्रा जातीचा असून लांबीला जवळपास साडे सहा फुटाचा आहे. रविवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती सर्पमित्र ज्ञानेश्वर याने  दिली.
 

Tags:  huge, Snake, found, gandhari, dombivali