Wed, Feb 20, 2019 09:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बक्षीस स्वरूपात मिळालेले चार कोटी वापरायचे कसे? 

बक्षीस स्वरूपात मिळालेले चार कोटी वापरायचे कसे? 

Published On: Dec 22 2017 9:33AM | Last Updated: Dec 22 2017 9:33AM

बुकमार्क करा

अंबरनाथ : प्रतिनिधी

ज्या स्तुत्य उपक्रमासाठी शासनाने पाठ थोपटून चार कोटी रुपयांचे बक्षीस अंबरनाथ नगरपरिषदेला दिले होते. त्या बक्षीसाचा निधी तशाच उपक्रमासाठी वापरणे अपेक्षित असतानाही हा निधी वापरायचा कसा, असा सवाल नगरपरिषदेला पडला आहे. या ‘गंभीर‘ प्रश्‍नामुळे गेल्या आठ महिन्यांपासून हा निधी तसाच बँकेत पडून आहे. यात लेखापाल आणि ऑडिटर असणारे सी. एच. डांगरे यांनी मात्र शक्कल लढवून ही रक्कम बँकेत ठेवी रूपाने ठेवल्याने त्याचे किमान दहा लाखांच्या व्याजाची भर या रकमेत पडली आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वात जास्त वैयक्तिक शौचालय बांधण्यात व इतर उपक्रमात तत्कालीन मुख्याधिकारी गणेश देशमुख यांच्या पुढाकाराने आघाडी घेतल्याने अंबरनाथ नगरपरिषदेला बक्षीस रुपाने तब्बल चार कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. हे बक्षीस मिळविण्यात तत्कालीन मुख्याधिकारी गणेश देशमुख यांचे मोठ योगदान होते. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर बक्षीसाची चार कोटी रुपयांची रक्कम आजवर तशीच पडून आहे. ही रक्कम वापरायची कशी असा गहन प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात हा निधी कसा वापरावा यासाठी तोंडी विचारणा सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप पालिकेला त्याचे कोणतेही उत्तर न मिळाल्याने निधी वापरासाठी पालिका हतबल झाल्याचे दिसून येत आहे. बक्षीस रुपाने मिळालेल्या रकमेतील काही रक्कम आपल्या प्रभागात मिळावी यासाठी काही नगरसेवक अधिकार्‍यांकडे खेटा मारत आहेत. मात्र ही रक्कम वॉर्डात खर्च न होता शहर पातळीवर त्याचा स्वच्छतेसाठी चांगल्या प्रकल्पावर खर्च व्हावा, अशी अपेक्षा काही अधिकारी व्यक्त करीत आहेत. अन्यथा या निधीचा विनियोग होणार नाही, अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

  या विषयी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर म्हणाल्या ‘हागणदारी मुक्त शहर आणि स्वच्छता यासाठी चार कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. अशाच उपक्रमासाठी हे पैसे वापरले गेले पाहिजेत, त्यासाठी मार्गदर्शन मागविण्याची गरज नाही. हा निधी आम्ही लवकरच वापरात आणू.’