होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हॉटेलच्या गच्चीवरील पार्टी पुन्हा रंगणार सभागृहात

हॉटेलच्या गच्चीवरील पार्टी पुन्हा रंगणार सभागृहात

Published On: Dec 08 2017 2:01AM | Last Updated: Dec 08 2017 2:01AM

बुकमार्क करा

मुंबई : राजेश सावंत

हॉटेलच्या गच्चीवरील पार्टीला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी परस्पर मंजुरी देऊन, शिवसेनेच्या युवराजांचे स्वप्न साकारले. पण पालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला प्रस्ताव नियमाचा आधार घेत, तो मागे घेण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. त्यासाठी शिवसेनेने दबाव आणल्याचे समजते. त्यामुळे सभागृहात भाजपा व काँग्रेस विरुध्द प्रशासन वाद रंगण्याची शक्यता आहे.

हॉटेलच्या गच्चीवर पार्टी करण्यास अधिकृत परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी हट्ट धरला होता. पण भाजपा व काँग्रेसचा पाठिंबा मिळत नसल्यामुळे 2015 पासून हा प्रस्ताव पालिका सभागृहात धूळखात पडून आहे. पालिका सभागृहात बहुमत नसल्यामुळे शिवसेनेने हा प्रस्ताव परस्पर पालिका आयुक्तांच्या अधिकाराखाली मंजूर करून घेतला. एवढेच नाही तर, याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरम्यान आयुक्तांनी परस्पर घेतलेल्या निर्णयाचा सभागृहात समाचार घेण्यासाठी गच्चीवरील पार्टीचा प्रस्ताव रोखून धरण्याचा निर्णय काँग्रेस व भाजपाने घेतला आहे. त्यामुळे आयुक्तच नाही तर, सत्ताधारी शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अधिनियम 36(2) चा आधार घेत, प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिनियम 36(2) नुसार पालिका सभागृहाने एकाद्या प्रस्तावाला 90 दिवसात मंजूरी दिली नाही तर, तो प्रस्ताव सभागृहाने मंजूर (डीमपास) केल्याचे गृहीत धरण्यात येते. याचाच आधार घेत, पालिका प्रशासन डिसेंबर महिन्याच्या सभागृहात प्रस्ताव मागे घेत असल्याचे विनंती करणार असल्याचे समजते. 

वाचा : भाजपाची रात्रबाजाराची योजना सेनेने रोखली!