Tue, Apr 23, 2019 09:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण

उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 19 2018 1:09AMमुंबई : संजय गडदे 

मुंबईसह अवघ्या महाराष्ट्राला वैशाख वणव्याच्या झळांचे चांगलेच चटके बसत आहेत. राज्यात मागील चार-पाच दिवसांपासून सूर्य चांगलीच आग ओकू लागला आहे. आद्रतेचे प्रमाण वाढल्याने मुंबईकरांचा चांगलाच घामटा निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे घशाला पडलेली कोरड दूर करण्यासाठी नागरिक लिंबू सरबत किंवा शहाळ्याच्या पाण्याकडे मोर्चा वळवू लागले आहेत, मात्र लिंबू, नारळ आणि शहाळ्याच्या किमती चांगल्याच वाढल्याने मुंबईकरांच्या खिशाला चांगलीच झळ सहन करावी लागत आहे. वाढत्या तापमानामुळे मुंबईच्या रस्त्या-रस्त्यांवर सरबत, गोळा, उसाचा रस, ताक आणि ताडगोळ्यांच्या गाड्या पाहायला मिळत आहे.

एकीकडे कामानिमित्त किंवा  मुंबई दर्शन करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना उन्हाचे चटके चांगलेच बसत आहेत. अशातच ते शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लिंबू सरवत, उसाचे रसाचे गुर्‍हाळ, किंवा ताकाच्या गाड्यांचा सहारा घेत आहेत. मात्र लिंबू, शहाळे, नारळ यांचे दरात प्रचं़ड वाढ झाल्याने गाड्यांवरील सर्वच पेये महागली आहेत. पंधरवडयापूर्वीपर्यंत दोन रुपयांना मिळणारा एक लिंबू आता पाच ते सात रुपयांना विकला जात आहे. तर उत्तम दर्जाचे पाणीयुक्त शहाळे दहा ते 15 रुपयांनी महाग होऊन 50 ते 60 रुपयांना विकले जात आहे. लिंबू महाग झाल्याने लिंबू सरबतच्या दरांतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कडक उन्हाळा असल्याने शीतपेयांकडे नागरिकांचा ओढा वाढलेला आहे. लिंबू सरबत,नारळ पाणी,ताडगोळे, शहाळ्याचे पाणी हे आरोग्यास उपयुक्त असल्याने नागरिकांची अशा पेयांना नागरिक अधिक पसंती देतात. या पेयांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते व ऊर्जाही वाढते. त्यामुळे सध्या मुंबईत रस्तोरस्ती लिंबू सरबत, ताक, लस्सी, ताडगोळे आणि शहाळे विक्रेत्यांनी व्यवसाय मांडल्याचे दिसून येत आहे. मात्र गेल्या काही दिवसांत या दोन्हींच्या दरांत लक्षणीय वाढ झाली आहे.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात 40 ते 45  रुपयांना विकला जाणारा शहाळा सध्या  50 ते 60 रुपयांना विकले जात आहे, शिवाय पंधरा दिवसांपूर्वी बाजारपेठेत दोन रुपये याप्रमाणे दहा रुपयांना पाच लिबू विकले जात होते. मात्र आता पाच ते सात रुपयांना एक लिंबू विकले जात आहेत. शिवाय विक्रीसाठी उपलब्ध असलेले लिंबू आकाराने खूपच लहान आहेत. त्यात हे लिंबू बारदाणाच्या गोणीत भरून विक्रीसाठी पाठविले जात असून या प्रवास कालावधीत उन्हाच्या तडाख्यामुळे ती लवकर खराब होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.