होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवारांचे हुकलेले गणित सुटण्याची शक्यता

शरद पवारांचे हुकलेले गणित सुटण्याची शक्यता

Published On: May 01 2018 1:39AM | Last Updated: May 01 2018 1:23AMमुंबई : उदय तानपाठक

राष्ट्रवादीचा अभेद्य गड मानला जाणारा पश्‍चिम महाराष्ट्र सध्या हातातून गेला असला, तरी आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा या भागात राष्ट्रवादीचाच गजर करण्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ठरविलेले दिसते. त्यामुळेच माजी मंत्री जयंत पाटील या मराठा नेत्याला प्रदेशाध्यक्षपदावर नेमले असल्याची चर्चा आहे. एकीकडे मैदानात मराठा असलेले जयंत पाटील यांच्यासारखे समंजस परंतु अभ्यासू नेतृत्व आणि विधिमंडळात धनंजय मुंडे यांच्या रूपाने तरुण, आक्रमक आणि ओबीसी नेता अशा दुहेरी तलवारीने सरकारवर हल्लाबोल करण्याची ही खेळी निवडणुकीच्या आधीच खेळल्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा फायदाच होणार आहे.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच नगरचा काही भाग हा राष्ट्रवादीचे बलस्थान मानले जाते. शरद पवारांना या भागातून नेहमीच भरघोस यश मिळत आले आहे. मात्र, गेल्या निवडणुकीने पवारांचे गणित बिघडवले होते. एरव्ही या सहा जिल्ह्यांतून सातत्याने बहुमत मिळत असताना गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र पश्‍चिम महाराष्ट्रातील 70 जागांपैकी केवळ 19 जागा राष्ट्रवादीच्या पदरात पडल्या होत्या. भरवशाच्या पुणे जिल्ह्यानेदेखील राष्ट्रवादीला धूळ चारली होती. पार 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला 2014 मध्ये जिंकता आल्या होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची धूळधाण झाली होती. मोदी लाटेने हा चमत्कार घडवला होता, हे तर खरेच; पण सुनील तटकरे हा ओबीसी आणि पश्‍चिम महाराष्ट्राबाहेरचा नेता प्रदेशाध्यक्ष असल्याने त्याचाही परिणाम झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतदेखील राष्ट्रवादीला धूळ खावी लागली होती. मराठा मोर्चाच्या यशानंतर तर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर ओबीसी नेता असणे आणखी उठून दिसत होते. त्यामुळेच आता पवारांनी पुन्हा एकदा मराठा नेत्याला प्रदेशाध्यक्ष करून आपल्या हक्‍काच्या मतदारांना साद घातली आहे.  

2004 मध्ये आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण असतानाही आर. आर. पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावर नेमले गेले आणि त्यांनी पक्षाला फायदा करून दिला. त्यानंतरदेखील 2009 च्या निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा आर. आर. पाटील प्रदेशाध्यक्ष झाले आणि राष्ट्रवादीला मराठा वर्गाने भरभरून मते दिली. आताही जयंत पाटील यांच्याकडे निवडणुका वर्षभरावर आल्या असताना प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. 

Tags : Mumbai, mumbai news, Jayant Patil, appointment, Maratha voter, returning, hope,