मुंबई : प्रतिनिधी
मुंबई शहर व उपनगरात तीन-चार रस्ते एकत्र येणार्या चौकात मुंबई महापालिकेने जास्त विद्युत खांबे न लावता प्रखर प्रकाश असलेला एकच हायमार्ट दिवा बसविला आहे. त्यामुळे पालिकेचा खर्च कमी होऊन संपूर्ण चौक परिसर जास्त प्रकाशमान झाला आहे. तसेच अंधुक प्रकाशामुळे होणार्या गुन्हेगारी घटना व वाहन अपघातांना हायमास्ट दिव्यांमुळे चाप बसेल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला.
मुंबई शहर व उपनगरातील रस्त्यांवरील चौकांच्या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे तब्बल 316 हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. त्यापैकी 216 दिवे हे पश्चिम उपनगरात बसविण्यात आले आहेत. पूर्व उपनगरात 117 तर शहरी भागात 59 दिवे बसवण्यात आले आहेत.
शहरीभागातील 59 दिव्यांपैकी 51 दिवे हे बेस्ट उपक्रमाकडे देखभाल व दुरुस्तीसाठी सोपविण्यात आले आहेत. नायर व जीटीबी रुग्णालय येथील प्रत्येकी दोन व तीन दिवे हायमास्ट दिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम रुग्णालयीन कर्मचारी करत आहेत. मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने नर्दुला टँक येेथील तीन हायमास्ट दिवे हे सध्या बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
पूर्व उपनगरातील सर्व 117 दिव्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी रिलायन्स एनर्जी व महावितरण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पश्चिम उपनगरातील 216 हायमास्ट दिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम रिलायन्स एनर्जीकडे सोपविण्यात आले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.