Wed, May 22, 2019 14:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओखीमुळे महापरिनिर्वाणदिनी समुद्रात जाण्यास मज्जाव!

'ओखी'मुळे महापरिनिर्वाणदिनी समुद्रात जाण्यास मज्जाव!

Published On: Dec 04 2017 12:22PM | Last Updated: Dec 04 2017 12:22PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

हवामान खात्याकडून अरबी समुद्रात चक्री वादळाची सूचना देण्यात आल्याने येत्या ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी येणाऱ्या अनुयायींना ‘ओखी’ वादळाचा धोका लक्षात घेता समुद्र किनारी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

४ ते ७ डिसेंबर या कालावधित समुद्रात येणाऱ्या उंच लाटांच्या भरतीमुळे कॅडल रोड आणि शिवाजी पार्क परिसरात समुद्राचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवशी चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात. ओखी वादळाच्या शक्यतेने सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांना समुद्र किनारी जाण्यास मज्जाव करण्यात आला असून, चैत्यभूमीवर आणीबाणीची परिस्थिती उदभवल्यास अग्निशमन दल, पोलिस, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, नौदल, स्थानिक यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

समुद्र किनारी असणाऱ्या वस्त्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याने चैत्यभूमीवर येणारे जनसमूदाय ज्या ठिकाणी मुक्काम करतात अशा ठिकाणी भरती आणि ओहोटीचे फलक लावण्यात येवून, कोणीही समूद्रात जावू नये म्हणून बॅरीकेटिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोकण किनाऱ्यासह मुंबई शहराला ओखी वादळाचा इशारा देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने वरील सूचना दिल्या आहेत.