Thu, Aug 22, 2019 11:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘गारपीटग्रस्तांसाठी केंद्राकडे २०० कोटींची मागणी’

‘गारपीटग्रस्तांसाठी केंद्राकडे २०० कोटींची मागणी’

Published On: Feb 14 2018 5:37PM | Last Updated: Feb 14 2018 5:37PMमुंबई : प्रतिनिधी

राज्यात गेल्या चार दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाडयामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत देण्यात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाकडे 200 कोटी रुपयांची मदत देण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

गारपीट आणि अवकाळी पावसामुळे साधारणता एक लाख ९० हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सुमारे १ हजार आठशे गावांचा त्यात समावेश आहे. पुढील दोन दिवसात पंचनाम्याबाबत अंतिम अहवाल अपेक्षित आहे. कृषीमंत्री यावेळी म्हणाले की, शनिवार व रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे १६ जिल्हयातील ६१ तालुक्यातील १ हजार २७९ गावांमधील १ लाख २७  हजार ३२२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. मात्र दि.१२ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ६ जिल्हयांमधील २० तालुक्यातील ५९५ गावांतील ६१ हजार ३६१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. बुलढाणा, नांदेड, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागात काल झालेल्या अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानाचा पंचनाम्याबाबत अंतिम अहवाल पुढील दोन दिवसात प्राप्त होईल.

आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत चर्चा झाली. फळ व शेती पीकांच्या नुकसानासाठी भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा अंतर्गत गारपीटीचा विकल्प दिला आहे अशा शेतकऱ्यांसाठी विमा योजनेतून रक्कम देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा काढला नाही परंतू गारपीटीने त्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांच्या मर्यादेत मदत देण्यात येईल, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.