Fri, Jul 19, 2019 05:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा हाहाकार

मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा हाहाकार

Published On: Jun 26 2018 1:21AM | Last Updated: Jun 26 2018 1:21AMमुंबई/ठाणे/पालघर : प्रतिनिधी

आभाळ फाटल्याप्रमाणे कोसळणार्‍या पावसामुळे मुंबई, ठाणे आणि पालघरात हाहाकार माजला. अनेक ठिकाणी जनजीवन पूर्णत: ठप्प झाले. या अतिवृष्टीत सहा जणांचे बळी गेले. यामध्ये पालघरातील दोन, मालाडमध्ये एक  आणि ठाण्यातील तिघांचा समावेश आहे. या वर्षी पावसाळ्यात पाणी साचणार नाही, असा मुंबई महापालिकेने केलेला दावा सपशेल फोल ठरला. गांधी मार्केट, हिंदमाता, मुंबई सेंट्रल त्याचबरोबर पश्‍चिम उपनगरातील मालाड, विले पार्ले, जोगेश्‍वरी तसेच कुर्ला या ठिकाणी कमरेइतके पाणी साचले.

पावसाचा लोकल सेवेवरही परिणाम झाला. पश्‍चिम रेल्वेच्या सर्वच गाड्या सुमारे 40 ते 50 मिनिटे उशिराने धावत होत्या. बेस्टच्या 47 मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. विमानसेवेलाही पावसाचा फटका बसला. नियोजित वेळेपेक्षा किमान अर्धा तास विलंबाने विमान वाहतूक सुरू होती. पावसाच्या साथीला जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे मुंबईत 110 झाडे उन्मळून पडली. ठाण्यात एका सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून तीन गाड्या त्याखाली दबल्या गेल्या. 

‘दोस्ती’चा खड्डा उठला लॉईडच्या जीवावर

संततधार कोसळणार्‍या पावसामुळे अ‍ॅन्टॉप हिल येथे दोस्ती रियालिटी विकासकाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या भूमिगत कामामुळे बाजूलाच असलेल्या  लॉईड इस्टेट या 32 मजली इमारतीची सुरक्षाभिंत व जमीन खचल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेत पार्किंग लॉनमध्ये पार्क करण्यात आलेल्या 15 महागड्या कार अंदाजे वीस ते तीस फूट खड्ड्यात पडून मातीच्या ढिगार्‍यात गाडल्या गेल्या. पहाटेची वेळ असल्याने या घटनेत जीवितहानी टळली.

याप्रकरणी अ‍ॅन्टॉप हिल पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक दोस्ती रियालिटी कंपनीचे मालक दीपक गरोडीया, अध्यक्ष किशन गरोडीया, संचालक राजेश शहा यांच्यासह पालिकेतील इमारत प्रस्ताव खात्यातील अधिकारी, वडाळा मंडळ व इमारत आणि कारखाने विभाग एफ वार्ड माटुंगा येथील संबंधित पदाधिकार्‍यांविरोधात 40 महिला रहिवाशांच्या तक्रारीवरुन भादंवि कलम 287, 336, 431 आणि 427 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.