Fri, Jul 19, 2019 18:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्याला पावसाचा तडाखा : तिघांचा मृत्यू

ठाण्याला पावसाचा तडाखा : तिघांचा मृत्यू

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 1:09AMठाणे : पुढारी टीम 

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाने दमदार बॅटिंंग केली. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि डोंबिवलीतही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात  921 मिमी पाऊस पडला असून ठाण्यात सर्वाधिक पाऊस 210 मिमी एवढा झाला. या पावसामुळे झालेल्या दुर्घटनेमध्ये जिल्ह्यात तीन जणांना प्राण गमवावे लागले तर पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील  एक कळव्याच्या नाल्यात पडून मृत पावला तर अन्य दोन उल्हासनगरमधील दुर्घटनेत आहेत. 

ठाणे जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंत 921. 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात सर्वात जास्त 210  तर सर्वात कमी 51 मिलिमीटर  पावसाची नोंद मुरबाड तालुक्यात झाली. भातसा आणि तानसा धरण क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली असली तरी ठाणेकरांना पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरण क्षेत्रात केवळ 57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

ठाण्यात रविवारी मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावून ठाणेकरांना हैराण केले. रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही ठाणेकरांनी सुट्टी घरात बसून घालविणे पसंद केले. सोमवारी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने राजकीय कार्यकर्त्यांसह शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. सकाळच्या सुमारास रस्त्यांवर कमी गर्दी दिसून आली. चोवीस तासात 229.81 मिमी पावसाची नोंद झाली. अधूनमधून मोठ्या सरी सुरूच होत्या . मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने रविवारी दुपारी कोपरी सर्कल ठाणे पश्‍चिम परिसरातील 12 बांगला परिसरातील एक जुने झाड कोसळले.  

शहरात दिवसभर झालेल्या पावसात शहरातील वंदना टॉकीज, सहयोग मंदिर परिसरातील कल्पना सोसायटी, कळव्यातील भीमनगर, आतकोनेश्‍वर नगर, मुंब्र्यातील अमृतनगर येथे पाणी साचण्याच्या घटना घडल्या. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने सक्शन पंप लावून पाण्याचा निचरा केला. घोडबंदर रोड येथील पोखरण रोड येथे रौनक पार्क सोसायटीतील 65 फूट लांब संरक्षक भिंत पडल्याने 2 वाहनांचे तर एका दुचाकीचे नुकसान झालं. यामध्ये तीन वाहनांचे नुकसान झाले.  आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्वरित  मलबा हटवला. तीन हात नाक्याजवळील गुरूद्वारा येथील सेवा रस्त्यावरही एक झाड पडल्यामुळं काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

ठाणे शहरात गेल्या वर्षी 25 जूनपर्यंत 488 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी 25 जूनपर्यंत 952 मि.मीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरात यंदा 488 मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली. मात्र कळवा रेल्वे रुळाच्या बाजूच्या नाल्यात पडून विजय किसन पवार या दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तो लघुशंकेसाठी नाल्यावर गेला असता तो त्यात पडून मृत पावला.

दुसरीकडे मुसळधार पावसामुळे अंबरनाथ नगरपालिकेच्या वडोलगांव येथे असलेल्या मलनिस्सारण केंद्राची संरक्षक भिंत रविवारी रात्री कोसळून 15 वर्षीय मुलगा जागीच ठार झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. किरण चंद्रकांत घायवट असे त्या मुलाचे नाव आहे. तर उल्हासनगरमध्येच मुसळधार पावसामुळे कारचा भीषण अपघात होवून प्रशांत ठाणगे (48) हा जागीच ठार झाला तर अन्य दोन जखमी झाले आहेत. 

पाणी तुंबण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी समिती

शहरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते अशा ठिकाणांचा अभ्यास करून या ठिकाणी कायमस्वरुपी तोड़गा काढ़ण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. नगर अभियंता अनिल पाटील यांच्या अधयक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे.

या ठिकाणी कायमस्वरुपी काय तोड़गा काढ़ता येईल याबाबत नगर अभियंता यांनी अभ्यास करुन या ठिकाणी कायमस्वरुपी तोड़गा काढ़ण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सदर अहवालाच्या अनुषंगाने पुढ़ील कार्यवाही करण्यात येईल असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.