Mon, Apr 22, 2019 03:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘फेरीवाला हटाव’ तीव्र करा!

‘फेरीवाला हटाव’ तीव्र करा!

Published On: Mar 04 2018 2:09AM | Last Updated: Mar 04 2018 2:09AMमुंबई : प्रतिनिधी 

एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर फेरीवाला मुक्त झालेल्या स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाले दिसू लागले आहेत. याबाबतच्या तक्रारी थेट आयुक्त कार्यालयात येऊ लागल्यामुळे शनिवारी पालिका आयुक्तांनी अधिकार्‍यांची कानउघाडणी करत, फेरीवाला हटाव मोहीम तीव्र करा, असे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. 

मुंबईतील रेल्वे स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाले दिसू लागले आहेत. विशेषत: दादर, भायखळा, बांद्रा, अंधेरी, जोगेश्वरी, कुर्ला, भाडुप, मुलुंड, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली या स्टेशन परिसरात गेल्या आठवडाभरात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. यात खाद्यपदार्थ गाड्यांसह कपडे व मोबाईल कव्हर विक्रेत्यांची संख्या जास्त आहे. एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरी घटनेनंतर दादर पश्‍चिमेकडील  फेरीवाले तब्बल चार महिने गायब झाले होते. 

रात्रीच्यावेळीही पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाड्या स्टेशन परिसरात तैनात असल्यामुळे फेरीचा व्यवसाय करण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. पण आता दिवसाही फेरीवाले दिसू लागले आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी केवळ विभाग कार्यालयातच नाही तर, थेट पालिका आयुक्त अजोय मेहता यांना केल्या जात होत्या. अखेर याची गंभीर दखल पालिका आयुक्तांनी घेतली आहे. आयुक्‍तांच्या सूचनेनंतर पालिकेच्या 24 विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांसह पालिकेचे अतिक्रमण निमूर्र्लन पथकावर कारवाई करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून पोलिसांचीही जादा कुमक मागवण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.