Tue, Apr 23, 2019 09:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत बिल्डरांनी रखडवली सव्वा लाख घरे

मुंबईत बिल्डरांनी रखडवली सव्वा लाख घरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

आधी नोटबंदी आणि नंतर आलेला रेरा कायदा यामुळे बांधकाम क्षेत्राला मंदीचा सामना करावा लागतोय. परिणामी ग्राहकांच्या हाती घराची किल्‍ली सोपवण्यात बांधकाम व्यावसायिकांकडून उशीर केला जात आहे. मुंबईमध्ये तब्बल एक लाख ३१ हजार घरे गेल्या दोन वर्षांत ग्राहकांच्या ताब्यात देण्यात आलेली नाहीत. हेच प्रमाण दिल्‍लीमध्ये सहा लाखांहून अधिक आहे.

बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या एका संस्थेने केलेल्या पाहणीत हे वास्तव उघड झाले आहे. दिल्‍लीसह देशातील ४३ महत्त्वाच्या शहरांचा या संस्थेने अभ्यास केला. या अहवालात २९.२३ लाख घरांची पाहणी करण्यात आली. ही घरे अर्धवट बांधलेल्या स्थितीत होती. त्यांचे ५० टक्के कामही पूर्ण झालेले नव्हते. प्रत्यक्षात वर्षभर आधीच ही घरे तयार व्हायला हवी होती. रेरा कायद्याची अंमलबजावणी ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी बांधकाम सुरू असलेले प्रकल्प या कायद्यामध्ये येऊ नयेत यासाठी विकासकांनी आटोकाट प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना भविष्यात याचा फटका बसू शकतो, असे या संस्थेने नमूद केले आहे. घर घेणार्‍यांच्या हक्‍कांवर गदा येऊ नये, त्यांची फसवणूक होऊ नये याची काळजी रेरामध्ये घेण्यात आली आहे. मात्र त्यांना याचा लाभ होतो आहे की नाही याची खातरजमा संबंधित सरकारी विभागांकडून व्हायला हवी. तसे झाले तरच या कायद्याला काही अर्थ राहील, असे संस्थेने म्हटले आहे.

ग्राहकांच्या संरक्षणासाठी हा कायदा असल्यामुळे अर्धवट आणि नवे प्रकल्प असा भेदभाव या कायद्यात नाही. या संदर्भात केंद्राने आपले म्हणणे याआधीच मुंबई उच्च न्यायालयात मांडले आहे, अशी माहिती आहे.