Mon, Jun 17, 2019 14:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : ३०० वर हॉटेल्स, पब्जवर हातोडा!

मुंबई : ३०० वर हॉटेल्स, पब्जवर हातोडा!

Published On: Dec 31 2017 2:07AM | Last Updated: Dec 31 2017 2:07AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

कमला मिलच्या कंपाऊंडमध्ये गच्चीवरील पबला लागलेल्या आगीत 14 निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर जाग आलेल्या मुंबई महापालिकेने शनिवारी धडक मोहीम उघडत 314 हून अधिक लहान मोठे हॉटेल्स/पब्जची बांधकामे तोडली. जगभरातून पालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेवर टीकेची झोड उठल्यानंतर 24 तासांत मुंबई महापालिकेच्या 24 विभागांमध्ये ही मोहीम हाती घेण्यात आली.  ऐन थर्टीफस्टची हॉटेलमध्ये जय्यत तयारी सुरू असताना झालेल्या या कारवाईमुळे हॉटेल व्यवसायिक चांगलेच हादरले आहेत.

शनिवारी अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द करून कमला मिल व रघूवंशी मिलमधील हॉटेलच्या अनधिकृत बांधकामासह अंधेरी-साकीनाका येथील थ्री स्टार पेनीलसुना हॉटेलचे 5 हजार चौरस फुटाचे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले. दिवसभरात कुलाबा ते दहिसर व फोर्ट ते मुलुंड पर्यंत तब्बल 200 हून जास्त लहान-मोठ्या हॉटेल्सची अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करण्यात आले. अशा अनधिकृत बांधकामांची यादीच पालिकेने तयार केली असून, ही सर्व बांधकामे पाडूनच ही मोहीम थांबणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 

अनधिकृत बांधकामाचे माहेरघर म्हणून मुंबईची काही वर्षात ओळख झाली आहे. पालिका अधिकार्‍यांच्या संगनमताने होणार्‍या या अनधिकृत बांधकामांकडेनेहमीच दुर्लक्ष होते. विशेष म्हणजे मुंबईत अनधिकृत बांधकाम होते, हे पालिकेचे अधिकारी कधीच मानायला तयार नसतात. पण कमला मिल कंपाऊंडमधील वन अबाव्ह आणि मोजो बिस्रो या पब्जमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचे बळी गेल्यानंतर पालिकेला मुंबईतील हॉटेलवाल्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा साक्षात्कार झाला. पालिका प्रशासनावर राजकीय दबावदेखील आल्यामुळे अवघ्या 24 तासांत हॉटेलची अनधिकृत बांधकामे शोधून काढत, ही कारवाई करण्यात आली. याचा अर्थ पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनाच नाही तर अतिक्रमण निर्मूलन विभागालाही हॉटेलांच्या अनधिकृत बांधकामांची माहिती होती. 

पालिकेच्या 24 विभागांत शनिवारी सकाळी हातातील सर्व कामे बाजूला ठेवून, सहाय्यक आयुक्तांनी आपला मोर्चा हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांकडे वळवला. विशेष म्हणजे कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या तातडीने रद्द करण्यात आल्या. सुट्टीवर गेलेल्या कर्मचार्‍यांना कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. शनिवारी दिवसभरात कुलाबा ते दहिसर व फोर्ट ते मुलुंडपर्यंत तब्बल 200हून जास्त लहान-मोठ्या हॉटेलवर धडक कारवाई करून, त्यांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. थर्टीफर्स्ट असल्यामुळे सर्वच हॉटेल चालकांनी आपल्या हॉटेलला विद्युत रोषणाई, हॅपी न्यू इयरचे बोर्ड व अन्य सजावट करण्यास सुरुवात केली होती. पण त्यांच्या हॉटेलवर पालिकेचा हातोडा पडल्यामुळे थर्टीफर्स्टच्या कराडो रुपयांच्या कमाईवर पाणी सोडावे लागणार आहे.

कारवाई पुढे ढकलण्यासाठी फिल्डिंग

हॉटेल व्यवसायामध्ये थर्टीफर्स्टला कमाईचा दिवस असतो. पण यावेळी थर्टीफर्स्टच्या मुहुर्तावर हॉटेलची तोडफोड कारवाई पालिकेने हाती घेतल्यामुळे हॉटेल व्यावसायिक बिथरले आहेत. आपल्या हॉटेलवरील कारवाई 1 जानेवारीपर्यंत पुढे ढकलावी, यासाठी अनेकांनी पालिकेच्या अधिकार्‍यांकडे फिल्डिंग लावली आहे. कारवाई करा, पण किमान थर्टीफर्स्टपर्यंत थांबा, अशी विनंती हॉटेलचालकांनी केली आहे.

लोअर परळ ‘पब’चे माहेरघर!

फोर्ट : क्रॉफर्ड मार्केट मुंबई पोलीस मुख्यालयाजवळील जाफरन हॉटेलने प्लॉस्टिक व पत्र्याच्या सहाय्यने बंदिस्त केलेले बांधकाम तोडण्यात आले. त्यामुळे अन्य वाढीव बांधकामही जमीनदोस्त करण्यात आले. रेस्टोबार या हॉटेलवरही कारवाई करण्यात आली. 

रघुवंशी मिल कंपाऊंड

रघुवंशी मिल कंपाऊंडमधील पी-22 बिल्डिंग येथील वाढीव बांधकाम, शेड व अन्य अनधिकृत भाग हटवण्यात आला.

जुहू : जुहू येथील व्ही. एम. रोडवर असलेल्या अलिशान वूडलॅण्ड हॉटेलच्या गच्चीवर अनधिकृत बांधकाम केले होते. या बांधकामाला नोटीस बजावत ते जमीनदोस्त करण्यात आले.

ग्रॅण्टरोड : ग्रॅण्टरोड येथील प्रसिद्ध शालिमार हॉटेलचे अनधिकृत बांधकामासह मुंबई सेंट्रल मराठा मंदिर येथील बांधकामावरही कारवार्ई करण्यात आली. दरम्यान मरिन लाईन्स येथील पारसी जिमखाना, विल्सन, कॅथोलिक, इस्लाम या जिमखान्यातील अनधिकृत बांधकामासह बेकायदेशीर शेडही हटवण्यात आली. 

गोरेगाव, पश्‍चिम

गोरेगाव पश्‍चिम येथील एस. एस. मार्गावरील सुप्रीम स्पाईक या हॉटेलमधील अनधिकृत शेड व एव्हरशाईन मॉलमधील तिसर्‍या मजल्यावरील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. गोल्डन गेट फिल्म सिटी येथील हॉटेलचीही बांधकामे तोडण्यात आली. 

मालाड : मालाड लिंक रोडवरील अलिशान मून हॉटेलची अनधिकृत शेड हटवण्यात आली. या हॉटेलमध्ये थर्टीफर्स्टची लगबग सुरू असताना, ही कारवाई झाल्यामुळे त्यांच्या कमाईवर पाणी फेरले गेले.

चेंबूर : चेंबूर येथील प्रसिद्ध फ्लामिंगो रेस्टॉरन्ट येथील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. चेंबूर भागातील सोई हॉटेलवरही कारवाई करण्यात आली. 

अंधेरी : अंधेरी पश्‍चिम स्टार बाजार लिंक रोडवरील  टेक इट इजी या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनधिकृत बांधकामासह काचा तोडण्यात आल्या. ही कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न झाला. पण पालिकेने त्यांचे म्हणणे न ऐकताच कारवाई पूर्ण केली. त्याशिवाय टप रेस्टॉरन्टचेही अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. शिशा स्काय हॉटेलचे 9 हजार चौरस फुटांचे बांधकाम हटवण्यात आले. 

घाटकोपर : घाटकोपर येथील प्रसिद्ध असलेल्या निलयोगी मॉल येथील अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने अखेर हातोडा घातला. या मॉलमधील अनधिकृत बांधकामाला राजकीय पक्षांचा आशीर्वाद असल्यामुळे आतापर्यंत कारवाई होऊ शकली नाही. त्याशिवाय चिराग नगर येथील संतोष बार आणि रेस्टॉरन्टही जमीनदोस्त करण्यात आले. 

साकीनाका : पेनिनसुला या थ्री स्टार हॉटेलवर कारवाई करण्यात आली. या हॉटेलमधील अनधिकृत बांधकामाला राजकीय आश्रय असल्यामुळे आतापर्यंत कारवाई झाली नव्हती. पण कमला मिलच्या दुर्घटनेनंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही हात वर केल्यामुळे पेनिनसुला या हॉटेलचे सुमारे 5 हजार चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.