Wed, Apr 24, 2019 19:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'राष्ट्रवादी'चा गुरूवारपासुन उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल 

'राष्ट्रवादी'चा गुरूवारपासुन उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल 

Published On: Feb 13 2018 2:53PM | Last Updated: Feb 13 2018 2:53PMमुंबई : प्रतिनिधी

विदर्भ व मराठवाड्यातील यशस्वी हल्लाबोल यात्रेच्या दौर्‍यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवार दि. १५ फेब्रुवारीपासुन उत्तर महाराष्ट्र विभागात हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. सात दिवसांच्या या झंझावती दौर्‍यात उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, जळगांव, धुळे या जिल्ह्यात २१ सभा होणार आहेत. १० मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील या दौर्‍याचा समारोप होणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने डिसेंबर महिन्यापासुन राज्यभरात हल्लाबोल यात्रा सुरू केली आहे. १ ते ११ डिसेंबर या काळात विदर्भात पदयात्रा केल्यानंतर जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात दहा दिवसात २७ सभांनी संपुर्ण मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पिंजून काढला होता. विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता पक्षाने उत्तर महाराष्ट्रात आपले हे आंदोलन सुरू केले असुन, त्याचा शुभारंभ गुरूवार दि.१५ फेब्रुवारी रोजी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथुन सुरू होत आहे. १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या सात दिवसात उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात २१ सभा होणार असुन, समारोप नाशिक येथे १० मार्च रोजी होणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे, विधानसभेचे गटनेते जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते अरूणभाई गुजराती, महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, युवक, विद्यार्थी, विविध आघाड्यांचे प्रमुख आमदार, खासदार, सेलचे प्रमुख व पक्षाचे पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. 

गुरूवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता श्रीगोंदा, दुपारी ४ वाजता शेवगाव, सायंकाळी ७.३० वाजता राहुरी, शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अकोले, सायंकाळी ४ वाजता कोपरगांव, सायंकाळी ७ वाजता येवला, शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता निफाड, दुपारी २ वाजता दिंडोरी, सायंकाळी ५ वाजता कळवण, रविवार दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता साटाणा, सायंकाळी ४ वाजता नवापूर, सायंकाळी ७ वाजता शहादा, सोमवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर, दुपारी ३ वाजता चोपडा, सायंकाळी ६ वाजता पारोळा, मंगळवार दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रावेर, दुपारी ३ वाजता बोदवड, सायंकाळी ६.३० वाजता जामनेर, बुधवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव, दुपारी ३ वाजता पाचोरा व सायंकाळी ७ वाजता चाळीसगांव येथे जाहिर सभा होणार आहेत. 

राज्यातील शेतकर्‍यांना जाहिर कर्जमाफीचा अद्याप न मिळालेला लाभ, बोंडअळी, तुडतुड्या रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, दोन दिवसांपुर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतीचे झालेले नुकसान, वाढती महागाई, बेरोजगार, युवकांचे प्रश्न राज्यातील ढासाळलेली कायदा व सुव्यवस्था, उत्तर महाराष्ट्रातील विकासाचे अनेक प्रलंबित प्रश्न या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी मांडणार आहेत.