Sun, Jul 21, 2019 09:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हागणदारीमुक्‍तीची डेडलाईन टळली

हागणदारीमुक्‍तीची डेडलाईन टळली

Published On: Apr 09 2018 1:50AM | Last Updated: Apr 09 2018 1:34AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत मिशनसाठी (ग्रामीण) निधी देण्यास विलंब झाल्यामुळे राज्याच्या हागणदारीमुक्‍तीची 31 मार्च 2018 ही डेडलाईन टळली आहे. जळगाव, गडचिरोली आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही गावांमध्ये अद्यापही स्वच्छतागृहे न बांधल्याने राज्य हागणदारीमुक्‍त होऊ शकले नाही.

उघड्यावरील शौचालय रोखण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंमलात आणले आहे. राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने हे मिशन राबविण्यात येत आहे. राज्यात 315 तालुक्यांपैकी 336 तालुके हागणदारीमुक्‍त जाहीर करण्यात आले आहेत. तर 40 हजार 501 गावांपैकी 40 हजार 54 गावांमध्ये उघड्यावर नैसर्गिक विधी होत नाही, असा दावा या विभागाच्या एका अधिकार्‍याने केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्‍ताईनगर नगरपंचायतीमध्ये काही कामे शिल्लक आहेत, तर  गडचिरोलीतील 12 पैकी सहा तालुक्यांमधील 150 ग्रामपंचायतीसुद्धा हागणदारीमुक्‍त झाल्या नाहीत. या ग्रामपंचायतींमध्ये 262 गावांचा समावेश आहे. नंदूरबारमधील सहापैकी एका तालुक्यातील एक ग्रामपंचायत खुल्या शौचापासून मुक्‍त होणे बाकी आहे.  या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील दोन गावांमध्ये शौचालये बांधण्यात आले नसल्याचेही या अधिकार्‍याने सांगितले.

हागणदारीमुक्‍तीची 31 मार्च ही डेडलाईन राज्य सरकार पाळू शकले नसले, तरी निधीची काहीही अडचण नाही. येत्या पंधरा दिवसांमध्ये उर्वरित सर्व कामे पूर्ण होतील, असा दावा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केला आहे.

Tags : mumbai, mumbai news,  haganadari free, Deadline, Avoided,