Mon, May 20, 2019 08:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत वाहनसंख्येचा प्रस्फोट!

मुंबईत वाहनसंख्येचा प्रस्फोट!

Published On: Jan 16 2018 2:13AM | Last Updated: Jan 16 2018 12:50AM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत प्रचंड वेगाने वाढणार्‍या लोकसंख्येशी वाहनांची संख्याही स्पर्धा करतेय. साधारणतः 35 वर्षांपूर्वी 3.2 लाखांवर असलेली वाहने आत्ताच्या घडीला तब्बल 32 लाखांवर पोहोचली आहेत. यापैकी 12 लाख वाहने तर केवळ 5 वर्षांमध्ये वाढली आहेत. समान हप्त्यांवर सहजगत्या होणारी उपलब्धता आणि वाहनांची वाढलेली निर्मिती या दोन गोष्टी प्रचंड वाहनवाढीला कारणीभूत ठरली आहे.

वाहनवाढीचा हा वेग असाच कायम राहिला तर येत्या दोन ते तीन वर्षांत आणखी दहा लाख वाहनांची भर मुंबई शहरात पडेल. मात्र असे असूनही गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांची लांबी आहे तितकीच म्हणजे दोन हजार कि.मी. इतकीच राहिली आहे. सध्या दरदिवशी मुंबईमध्ये किमान 700 नवीन वाहने रस्त्यावर येतात.

वाहनवाढीच्या संदर्भात एका सामाजिक संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये ही स्थिती समोर आली आहे. दुचाकी, अ‍ॅपवर आधारित टॅक्सी आणि शाळेच्या बसेसची संख्या गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यातही दुचाकी वाहनांच्या वाढीचा वेग राक्षसी आहे. सध्या रस्त्यावर असलेल्या खासगी कारपेक्षा दुचाकींची संख्या जवळपास दुप्पट आहे. कारची संख्या दहा लाखांच्या घरात तर दुचाकींची संख्या 18 लाखांवर पोहोचली आहे, अशी माहिती वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी दिली. दुचाकींची संख्या वाढतच राहणार असून त्याचा त्रास रहदारीला होईलच शिवाय त्यांच्या अपघातांचेही प्रमाण वाढू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्‍त केली.  

अ‍ॅपवर आधारित टॅक्सी गेल्या 4 वर्षांमध्ये शून्यावरून तब्बल 45 हजारांवर गेली आहे. अर्थात येत्या काही वर्षांमध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार नाही, असेही दातार म्हणाले. कारण कार घेण्याची ऐपत असणारे तरुण सध्या अ‍ॅपवर आधारित टॅक्सीचा वापर करून आपली गरज भागवत आहेत. या टॅक्सी सध्या दरदिवशी 12 फेर्‍या मारतात. तर काळी- पिवळीच्या चार ते पाचच फेर्‍या होतात. खासगी कारच्या फेर्‍यांचे प्रमाण दिवसाकाठी केवळ दोन आहे. 

अधिकाधिक बसेस रस्त्यावर हव्यात

2000-2001 मध्ये शाळेसाठी वापरल्या जाणार्‍या बसेसची संख्या केवळ 700 इतकीच होती. आता ती मुंबईतच 3 हजार 775 वर पोहोचली आहे. अशा बसेसच्या नोंदणीवर कोणत्याही प्रकारची मर्यादा घालता कामा नये. अधिकाधिक बसेस रस्त्यावर धावू लागल्या की, खासगी कारच्या धावण्याचे प्रमाण मर्यादित राहते. त्याचबरोबर टॅक्सी, खासगी कार तसेच मेट्रोचा प्रवास येत्या काही वर्षांत रस्त्यावरील  वाहतुकीचा ताण कमी करू शकेल. विशेषतः कुलाबा ते दहिसर आणि ठाणे या ठिकाणी मेट्रो धावू लागल्यास त्याचा परिणाम निश्‍चितच दिसेल. लंडन आणि सिंगापूरमध्ये मेट्रोमुळे खासगी कारवर असणारा वाहतुकीचा ताण कमी झाला आहे, अशी माहिती या क्षेत्रातील कार्यकर्ते सुनील मोने यांनी दिली.