Sun, Jul 21, 2019 05:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संतापजनक; रुग्णालयाच्या दारातच पोटातल्या बाळासह गर्भवतीचा मृत्यू!

तासभर डॉक्टर आले नाहीत; गर्भवतीचा बाळासह मृत्यू

Published On: Mar 22 2018 1:43AM | Last Updated: Mar 22 2018 11:20AMमुंबई : प्रतिनिधी

जे.जे. रुग्णालयाच्या दारात डॉक्टरांची सुमारे तासभर वाट पाहूनही कोणी डॉक्टर उपलब्ध झाला नाही आणि एका गर्भवती महिलेला तिच्या पोटातल्या बाळासह मृत्यूने कवटाळले. जळगाववरून या महिलेला उपचारांसाठी जेजेत आणण्यात आले होते. शनिवारी सकाळी ही घटना घडली. 

रुग्णालयात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा होता आणि आयसीयुतले बेडही रिकामे नव्हते, अशी कारणे ड्युटीवर असणार्‍या आरोग्य अधिकार्‍यांनी दिली. वैशाली निकम असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून विशेष म्हणजे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या महिलेला तातडीने उपचार मिळावेत म्हणून जेजेचे अधिष्ठाता एस. डी. नानडकर आणि आरोग्य अधीक्षक डॉ. संजय सूरसे यांना फोन केले होते, पण दोघांचे फोन बंद होते. खडसे यांनी हा मुद्दा विधीमंडळातही उपस्थित केला.  

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने वैशाली निकम यांच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे. वैशाली यांना जेजे रुग्णालयाच्या बाहेर थांबवून ठेवण्यात आले होते, हेही संचालनालयाने मान्य केले आहे. 

जळगाव येथे राहणार्‍या वैशाली यांना बाळंतपणासाठी जळगाव सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी वैशाली यांना जेजेत दाखल करण्याचा सल्ला वैशालीचे पती समाधान यांना दिला. वैशाली यांना अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला आणण्यात आले. पहाटे 5.30 वाजता अ‍ॅम्ब्युलन्स जेजेला आली. वैशाली यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे आणि जेजेत ते उपलब्ध नाही, शिवाय आयसीयूत बेडही नाही असे समाधान यांना डॉक्टरांनी सांगितले. एका तासाच्या खटपटीनंतर नातेवाईकांनी वैशालीला जेजेत दाखल करून घेतले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 

माझ्या बायकोचा आणि बाळाचा जीव वाचवता आला असता, पण डॉक्टरांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. गरीबाला कुणी वाली नसतो, अशी खंत वैशालीचे पती समाधान यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.