Thu, Apr 25, 2019 13:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्ह्यात दुपारपर्यंत ३९ टक्के मतदान, महिलांची संख्या लक्षणीय 

ठाणे जिल्ह्यात दुपारपर्यंत ३९ टक्के मतदान, महिलांची संख्या लक्षणीय 

Published On: Jun 25 2018 9:37AM | Last Updated: Jun 25 2018 12:21PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

 कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून ठाणे जिल्ह्यात मतदानास सुरुवात झाली. पावसाचा वाढता जोर असूनही तरुण पदवीधरच नव्हे तर ज्येष्ठांनी देखील उत्साहाने मतदान केले. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर आणि त्यांच्या पत्नी कलाराणी कल्याणकर यांनी देखील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. दुपारपर्यंत सुमारे ३८.५७ टक्के मतदान झाले असे निवडणूक विभागाने सांगितले. विशेष म्हणजे मतदानात महिलांची संख्या लक्षणीय होती.

जिल्ह्यात सकाळी ११ पर्यंत २२ टक्क्यांच्या पुढे मतदान झाले होते. ९ हजार ७७५ मतदारांनी मतदान केले होते.  दुपारी १ पर्यंत ११ हजार २७४ पुरुष आणि ६ हजार ४०६ स्त्री मतदार अशा १७ हजार ६८० मतदारांनी मतदान केले. निवडणूक निरीक्षक आर. आर. जाधव यांनी देखील आज काही मतदान केंद्रांवर भेट देऊन व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी त्यांच्यासमवेत होते

मतदारांची गैरसोय टळली

दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील मतदान केंद्राकडे जाणारा रस्ता जोरदार पावसामुळे पाण्याखाली गेल्याने मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने जेसीबीच्या सहायाने तहसीलदार अधिक पाटील यांनी खडी टाकून तात्पुरता रस्ता तयार केल्याने मतदारांना जाणे येणे सोपे झाले.

मुरबाड, शहापूर, सारख्या ठाण्यापासून दूरवरील तालुक्यातील मतदार देखील सकाळपासून मतदानासाठी बाहेर पडले होते . भिवंडीतील तिन्ही मतदार केंद्रांवर १ वाजेपर्यंत ३६.६६ टक्के मतदान झाले होते. कल्याणमधील ६ मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत ३७.९७ टक्के मतदान झाले. मुरबाड मध्ये हेच मतदान सुमारे ४२ टक्के झाले होते. उल्हासनगर मधील तिन्ही मतदान केंद्रांवर देखील ४० टक्यांच्या आसपास मतदान झाले होते. अंबरनाथ मध्ये देखील ४० ते 42 टक्के मतदान झाले. भाईंदर, तुर्भे  येथेही मतदारांनी उत्साह दाखविला.

ठाण्यात 45 हजार 834 मतदार
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाणे  जिल्हयातील ठाणे तालुक्यामध्ये एकूण   26 हजार  567  इतके  मतदार आहेत. यामध्ये कल्याण तालुक्यात  6,676,  भिवंडीयत3,306 ,  शहापूरमध्ये  2340, मुरबाड  तालुक्यामध्ये  1469,उल्हासनगर  तालुक्यामध्ये   1,979, अंबरनाथमध्ये 3497 मतदार  आहेत.