Fri, Aug 23, 2019 21:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्जमाफीची सरकारकडे जिल्हानिहाय माहितीच नाही

कर्जमाफीची सरकारकडे जिल्हानिहाय माहितीच नाही

Published On: Apr 11 2018 1:41AM | Last Updated: Apr 11 2018 12:46AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी भाजप सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्हानिहाय निधीवाटपाची सरकारकडेच माहिती नसल्याचे उघडकीस आले आहे.

शेतकर्‍यांच्या कर्जमुक्‍तीसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 46 लाख 52 हजार शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये  14 हजार 388 कोटी रुपये जमा केले आहेत; पण या निधीवाटपाची जिल्हानिहाय आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नसल्याची कबुली माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे जनमाहिती अधिकारी दि. म. राणे यांनी दिली आहे.

गलगली यांनी राज्यातील शेतकर्‍यांच्या माफ केलेल्या कर्जाच्या माहितीसोबतच शेतकर्‍यांची संख्या, एकूण मंजूर आणि नामंजूर अर्जांची संख्या, बँकांची नावे, एकूण वाटप निधीबाबत माहिती मागितली होती. त्यावर शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी 36 जिल्हे आणि इतर असे एकूण 37 जिल्ह्यांमधून 56 लाख 59 हजार 159 अर्ज आल्याचे सांगितले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेने अहमदनगर जिल्ह्यात 3 लाख 34 हजार 920 सर्वाधिक अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे, राज्यात इतर नावाचा जिल्हा नसताना या ठिकाणाहून 14 हजार 797 अर्ज आल्याचे सांगण्यात आले.  मुंबई उपनगरांतून 1,620 आणि मुंबई शहरामधून 23 हजार 715 अर्ज आले आहेत.

राष्ट्रीयीकृत बँकांत 19 लाख 88 हजार 234 खाती मंजूर झाली असून, 77,66,55,13,440.76 इतकी रक्‍कम बँकांस दिली आहे. बँकांनी 75,89,98,20,857.28 इतकी रक्‍कम लाभार्थ्यांना वाटप केली आहे. विविध जिल्हा बँकांत (डीसीसी) 26,64,576 खाती मंजूर झाली असून, 67,70,18,88,772.36 इतकी रक्‍कम बँकांना दिली आहे. बँकांनी 67,97,74,78,292.76 इतकी रक्‍कम लाभार्थ्यांना वाटप केली आहे.

mumbai, mumbai news, debt relief,  district wise information, government