Thu, Apr 25, 2019 13:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशातील बेरोजगारांची सरकारकडे आकडेवारीच नाही

देशातील बेरोजगारांची सरकारकडे आकडेवारीच नाही

Published On: Aug 03 2018 2:18AM | Last Updated: Aug 03 2018 1:56AMठाणे : खास प्रतिनिधी

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारी नुसार आजमितीला तीन कोटींहून अधिक लोक रोजगाराच्या शोधात भटकत आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार दरवर्षी दीड कोटी लोक जॉब मार्केटमध्ये प्रवेश करतात; पण सरकारकडे रोजगाराची आकडेवारीच नसल्याची टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेत केली. 

खा. डॉ. शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहरात बेरोजगारीच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले. मध्य प्रदेश उच्च न्यायालयात शिपाई, वाहक, सफाई कर्मचारी, वॉचमन आदी 738 जागांसाठी भरती झाली, त्यासाठी दोन लाखांहून अधिक अर्ज आले, ज्यात सिव्हिल इंजिनीअर्स, एमबीए, पीएचडी आदींची संख्याही मोठी होती. पाच कोटीहून अधिक लोकांनी देशभरातील रोजगार केंद्रांमध्ये नोंदणी केली आहे, मात्र रोजगार मंत्रालयानेच लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार या केंद्रांच्या माध्यमातून आजवर केवळ 0.56 टक्के लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले.

इतकी भीषण परिस्थिती असताना सरकारकडे कुठल्याही प्रकारची आकडेवारी नाही. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत रोजगार निर्मिती होत असल्याचा दावा करताना सरकारकडे याची आकडेवारी नसल्याची कबुली दिली होती. 

एकीकडे सरकार रोजगारनिर्मितीचे दावे करत असले तरी भाजपच्याच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी दोनच दिवसांपूर्वी वाढत्या बेरोजगारीमुळे मॉब लिंचिंगचे प्रकार होत असल्याचे विधान केले आहे. याकडेही शिंदे यांनी सरकारचे लक्ष वेधले. 

रोजगार मिळत नसल्यामुळे लोकांमधले नैराश्य वाढत आहे. हे नैराश्य काढण्याचा कुठलाही मार्ग नसल्यामुळे झुंडीकडून निष्पाप लोकांच्या हत्या होण्याचे प्रकार घडत आहेत, असे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. सरकारने बेरोजगारीच्या समस्येची गंभीर दखल घेऊन रोजगारनिर्मितीसाठी वेगाने प्रयत्न करावेत, अशी मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली.