Sun, Nov 18, 2018 05:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आईच्या अत्यविधीसाठी काढले कर्ज, पोलिसांनी केली मदत

गोवंडीत वर्दीतील माणुसकीचे घडले दर्शन !

Published On: Dec 16 2017 1:45AM | Last Updated: Dec 16 2017 1:45AM

बुकमार्क करा

गोवंडी : वार्ताहर

वडिलांचे छत्र नसलेल्या तीन मुलांना घरकाम करून जगविणार्‍या आईचा बसची वाट बघत असताना झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मुलांवर डोंगर कोसळला. अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने मुलांनी 15 हजार रुपयाचे कर्ज काढून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मन हेलावून टाकणार्‍या या घटनेने गोवंडी पोलीसही हळहळले. पोलिसांनी  स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या खिशात हात घालीत मुलांना 17 हजारांची मदत केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा वर्दीतील माणुसकीचे दर्शन गोवंडी पोलिसांनी दिले.

मुंबईच्या चेंबूर परिसरात गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान डायमंड गार्डन समोरील आचार्य उद्यान बस स्थानकावर शारदा सहदेव घोडेस्वार(45) या बसची वाट बघत होत्या. दरम्यान त्यांच्या अंगावर गुलमोहराचे मोठे झाड कोसळले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

घरकाम करून आपल्या मुलांचे संगोपन करणार्‍या शारदा यांना बारावीत शिकणारा मोठा मुलगा सुमित, दुसरा दहावीत शिकणारा सुशांत आणि सातवीत शिकणारी मुलगी स्वप्नाली आहे. ते सर्व आजीसोबत राहतात. मात्र आईच्या अचानक जाण्याने मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. 

मुलांनी मोठ्या हिमतीने अंत्यविधीसाठी पैशाची जुळवाजुळव केली. मात्र ती झाली नसल्याने अखेर त्यांनी अंत्यसंस्कारासाठी 15 हजार रुपयाचे कर्ज घेतले. या कर्जातून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते अशा कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचतात. मात्र या कुटुंबाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने मोठी अडचण निर्माण झाली.

या पोरक्या झालेल्या मुलांनी आईच्या अंत्यविधीसाठी कर्ज घेतल्याची माहिती मिळताच गोवंडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी काही तासांतच आपआपल्या खिशात हात घालून सतरा हजार रुपये गोळा केले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी या कुटुंबाची त्यांच्या पांजरपोळ येथील घरी जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्यासह कर्मचार्‍यांनी भेट घेत आर्थिक मदत केली. गोवंडी पोलिसांनी दाखवेलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.