होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोसीखुर्द घोटाळा : आणखी सहा गुन्हे दाखल

गोसीखुर्द घोटाळा : आणखी सहा गुन्हे दाखल

Published On: Feb 21 2018 2:06AM | Last Updated: Feb 21 2018 2:06AMमुंबई : प्रतिनिधी

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणार्‍या गोसीखुर्द सिंचन प्रकाल्पातील विविध कामांच्या निविदा प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी आणखी सहा गुन्हे दाखल केले. गृहमंत्रालयाच्या आदेशावरून सुरू असलेल्या उघड चौकशीअंती नागपूर शहर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे जलसंपदा मंत्री असल्यापासून सिंचन प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2015 मध्ये एसीबीला या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेल्या 13 सिंचन प्रकल्पांपैकी बाणगंगा धरण प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी ठाणे एसीबीने गुन्हे दाखल करत तपास केला.

त्यानंतर नागपूर एसीबीने गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराबाबत यापूर्वी 8 गुन्हे दाखल केल्यानंतर आता आणखी 6 गुन्हे दाखल केले आहेत. यातील दोन प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विशेष न्यायाधीश नागपूर येथे एसीबीने दोषारोपपत्र सादर केले आहे.

1.  गोसीखुर्द उजव्या कालव्यावरील बांधकामाच्या निविदाप्रक्रियेमध्ये नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदेचे मूल्य वाढविले. फर्मची नोंदणी निबंधक कार्यालयाकडे न करताच कंत्राटदारांना निविदाप्रक्रियेमध्ये सहभागी केले. बयाणा रकमेचे डीडी स्वत:च्या खात्यातून दिला. याप्रकरणी विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी, कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के, मे. खळतकर कन्स्ट्रक्शन आणि मे. श्री निवासा कन्स्ट्रक्शन कंपनीचे मुखत्यारपत्रधारक जयंत खळतकर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2.  अंभोरा उपसा सिंचन योजनेच्या किन्ही (मांढळ) वितरीकेवरील जलसेतूचे व लादीमोरीचे मातीकाम निविदेमध्ये नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदेचे मूल्य वाढवल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता मुकेश राणे, विभागीय लेखाधिकारी चंदन चिभकाटे, अधीक्षक अभियंता दिलीप पोहेकर, मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी आणि कार्यकारी संचालक देवेद्र शिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3. गोसीखुर्द उजवा कालवा 91 ते 99 किलोमीटरमधील खोदकाम, मातीकाम, अस्तरीकरण आणि बांधकामात निविदा प्रक्रियेदरम्यान नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदेचे मूल्य वाढवले. याप्रकरणी विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी आणि कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के यांना जबाबदार ठरवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4. घोडाझरी शाखा कालव्याच्या 26 ते 37 किलोमीटरचे मातीकाम आणि बांधकामाच्या निविदाप्रक्रियांमध्ये नियबाह्य अद्ययावतीकरण करून निविदेचे मूल्य वाढविले. याप्रकरणी कार्यकारी अभियंता ललित इंगळे, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी, कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के आणि विभागीय लेखाधिकारी गुरूदास मांडवकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5. मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याचे 27 किलोमीटरपर्यंत, तसेच नवशी शाखा व चार वितरीकांचे मातीकाम आणि बांधकमाच्या निविदाप्रक्रियेमध्ये नियबाह्य अद्ययावतीकरण करून निविदेचे मूल्य वाढविले. याप्रकरणी कार्यकारी अभियंता उमाशंकर पर्वते, विभागीय लेखाधिकारी सी. टी. जिभकाटे, मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी, कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के आणि अधीक्षक अभियंता डीडी पोहेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

6. गोसीखुर्द प्रकल्पातील घोडाझरी शाखा कालव्याच्या बांधकामाच्या निविदाप्रक्रियेमध्ये नियबाह्य अद्ययावतीकरण करून निविदेचे मूल्य वाढविले. कंत्राटदाराला अवैधरित्या सहभागी करून संगनमताने गैरव्यवहार केला. याप्रकरणी कार्यकारी अभियंता ललित इंगळे, अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी, कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के आणि विभागीय लेखाधिकारी गुरूदास मांडवकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.