Sun, Jul 21, 2019 05:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारतातील पहिल्या महिला कल्याणकर डॉक्टरला गुगलची मानवंदना

देशातील पहिल्या महिला डॉक्टर आणि कोल्हापूर कनेक्शन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

देशातील पहिली महिला डॉक्टर अशी ओळख असणाऱ्या कल्याणकर आनंदीबाई जोशी यांना गुगलने शनिवारी डुडलद्वारे (Google Doodle) मानवंदना दिली आहे. डॉ. आनंदीबाई जोशींच्या जन्मदिनानिमित्त गुगलने आपल्या होमपेजवर त्यांचे डुडल प्रसिद्ध केले आहे. 

मूळच्या कल्याणकर असणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी झाला. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्या गोपाळराव जोशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. गोपाळराव हे पोस्ट ऑफिसमध्ये क्लार्क पदावर कार्यरत होते. पुरोगामी विचारसरणीचे ओळखले जाणारे गोपाळराव हे महिलांनीही शिक्षण घ्यावे अशा मानसिकतेचे होते. तर वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी या आनंदीबाईंनी मुलाला जन्म दिला. मात्र आवश्यक औषधोपचार न मिळाल्याने दहा दिवसांतच हे बाळ दगावले. ही घटना आनंदीबाई आणि गोपाळराव यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आपल्या बाळाच्या मृत्यूने खचून न जाता आनंदीबाईंनी  डॉक्टर होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. 

मात्र अथपासून इतिपर्यंतचा त्यांचा हा प्रवास अनेक खाचा खळग्यांनी भरलेला होता. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यापासून ते त्यांना विरोध करणाऱ्या तत्कालीन समाजातील प्रवृत्तींनी त्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. आपल्यातील एक महिला वैद्यकीय शिक्षण घेते आणि ते सुद्धा परदेशात जाऊन या विचारानेच बुरसटलेल्या समाजाला पोटशूळ उठला. मात्र गोपाळराव जोशी यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आनंदीबाईं या सर्व विरोधाला पुरून उरल्या. दरम्यान 1883 मध्ये गोपाळ जोशींची बदली तत्कालीन कलकत्ता तर आताच्या कोलकात्याला झाली. त्यावेळी गोपाळरावांनी आनंदीबाईंनी अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेतला. 

त्यांनी वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्नीसलीव्हीनियामध्ये प्रवेशासाठी अर्ज केला. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. मात्र तिकडचे थंड तापमान आणि आहारातील बदलामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम  झाला. मात्र त्याची तमा न बाळगता अखेर 11 मार्च 1885 मध्ये त्यांनी डॉक्टरकीची पदवी प्राप्त केली. मग 1886 च्या काळात त्या भारतात परतल्यावर आनंदीबाईंचे अत्यंत जंगी स्वागत करण्यात आले. 

कोल्हापूरच्या राजघराण्याने त्यांची स्थानिक रुग्णालयात महिला विभागाच्या प्रमूख वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती केली. मात्र वयाची 22 वर्ष पूर्ण होण्याच्या काही दिवसांपूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. टीबीच्या (क्षयरोग) आजाराने पुण्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या असताना त्यांना टीबीची लागण झाली होती. देशातील पहिल्या महिला डॉक्टरच्या आजारामुळे अशा अकाली मृत्यूने सर्वानाच मोठा धक्का बसला. अशा देशातील पहिल्या महिला डॉक्टरला गुगलने डुडलद्वारे वाहिलेली मानवंदना निश्चितच महत्वपूर्ण ठरली आहे.

Image may contain: 4 people

Tags : google doodle,  India, Anandi Gopal Joshi,  doctor


  •