Sat, Aug 24, 2019 21:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 1 रुपयाचे कर्ज : बँकेने अडकवले लाखोंचे सोने

1 रुपयाचे कर्ज : बँकेने अडकवले लाखोंचे सोने

Published On: Jul 04 2018 8:26AM | Last Updated: Jul 04 2018 8:26AMकांचीपुरम : वृत्तसंस्था

विजय मल्ल्या तसेच निरव मोदी यांच्यासारखे उद्योगपती बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झाले आहेत. आतापर्यंत तरी बँका त्यांचे काहीही वाकडे करु शकल्या नाहीत. असे असताना सामान्य माणसाला मात्र किरकोळ कारणांवरुन बँकांकडून मोठा त्रास दिला जातो. असेच एक प्रकरण सध्या तामिळनाडूमध्ये जोरदार गाजत आहे. केवळ एका रुपयासाठी एका ग्राहकाचे बँकेने लाखो रुपयांचे सोने अडवून ठेवले असून हे प्रकरण आता हायकोर्टात पोहोचले आहे.

कांचीपुरम येथे एका सहकारी बँकेने कर्जफेडीचा एक रुपाया बाकी असल्याचे सांगून ग्राहक सी कुमार यांनी बँकेत ठेवलेले 3.5 लाखांचे 169 ग्रॅम सोने परत करण्यास नकार दर्शवला आहे. अर्थात कर्जाचा बाकी असलेला एक रुपाया सी कुमार यांना द्यायचा नाही असे नाही. परंतु बँकेने मोठ्या प्रमाणात त्रास दिल्याने त्यांनी आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. 

सी कुमार यांनी कांचीपुरम मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 6 एप्रिल 2010 रोजी 31 ग्रॅम सोने गहाण ठेवून 1.23 लाखांचे कर्ज घेतले होते. 28 मार्च 2011 रोजी त्यांनी व्याजासह कर्जाची परतफेड केली. परंतु बँकेच्या रेकॉर्डनुसार कर्जाचा एक रुपया बाकी होता. यानंतर 9 फेब्रुवारी 2011 रोजी त्यांनी 85 ग्रॅम सोने गहाण ठेवून 1.05 लाखांचे कर्ज घेतले. यानंतर 28 फेब्रुवारी 2011 रोजी आणखी 52 ग्रॅम सोने गहाण ठेवून त्यांनी 60 हजार रुपयांचे कर्ज घेतले. काही दिवसांनी त्यांनी दोन्ही कर्ज फेडून टाकले. मात्र कर्जफेडीचा एक रुपाया बाकी असल्याने त्यांचे कर्जाचे खाते सुरुच ठेवण्यात आले.

सी कुमार यांचे वकील एम साथयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सी कुमार यांनी अनेकदा बँकेला एक रुपया घेवून गहाण असलेले सोने परत करण्याची विनंती केली. पोलिसांनीही बँकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यांना सोने परत मिळाले नाही. यामुळे गहाण ठेवलेल्या सोन्याच्या सुरक्षिततेबाबत शंका असल्याने आता त्यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.