Tue, Jun 18, 2019 22:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात ठेवला कापूस

प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात ठेवला कापूस

Published On: Jun 10 2018 12:21PM | Last Updated: Jun 10 2018 12:21PMनालासोपारा : वार्ताहर

नालासोपारा पूर्वेतील महापालिकेच्या रुग्णालयात प्रसूत झालेल्या आणि देशपातळीवर आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवलेल्या महिलेच्या पोटात गॉज पीस राहिल्याचे खासगी रुगणालयात केलेल्या तपासणीत उघड झाले. यामुळे पालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. नालासोपारा पश्चिमेत समेळपाडा येथे राहणार्‍या शब्बीर शेख आणि शमा शेख या दिव्यांग दाम्पत्याने देशपातळीवरील अ‍ॅथलेटीक स्पर्धेत आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवलेल्या दाम्पत्याला डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा मनस्ताप सोसावा लागला. शमा शेख प्रसूतीपूर्वी खासगी डॉक्टरांकडे तपासणी करत होत्या. मात्र, त्यांची आर्थिक परिस्तिथी बेताची असल्याने त्या वसई- विरार महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांना 27 एप्रिल रोजी प्रसूतीकळा आल्यानंतर पालिकेच्या सर्वोदय माता संगोपन केंद्र येथे दाखल केले. त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. मात्र, प्रकृती नाजूक असल्याने आणि पालिकेच्या रुग्णालयात सुविधा नसल्याने शमा यांच्या बाळाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी मातेवर महापालिकेच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शस्त्रक्रिया करताना वापरला जाणारा कापूस (गॉज पीस) शमा यांच्या पोटात तसाच राहिला. 

दरम्यान, पेशंट रुग्णालयात दाखल झाले तेव्हा नॉर्मल डिलेव्हरीसाठी ठेवण्यात आले. त्यानंतर बाळाने पोटात शौच केले असल्याने तात्काळ डिलेव्हरी किंवा सिझेरियन करण्याची गरज होती. त्यांना बाळाच्या जीविताला धोका असल्याने सिझेरियन करावे लागले. दरम्यान सदर महिलेच्या पोटात गॉज तसाच राहिला. त्यानंतर 40 दिवसांनी ती महिला गुरुवारी रात्री आल्यानंतर तो गॉज बाहेर काढण्यात आला. मात्र, महिलेला इन्फेक्शन झाले नव्हते. काही काळानंतर शमा यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात तपासणी केली. त्यांच्या पोटात कापूस असल्याचे सोनोग्राफी रिपोर्टमध्ये आढळून आले.

महापालिकेच्या रुग्णालयात शनिवारी सकाळी 11 वाजता तो गॉज पीस काढण्यात आला. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.