Mon, Apr 22, 2019 12:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणात भाजी विक्रेत्या महिलेसह मुलीला मारहाण

कल्याणात भाजी विक्रेत्या महिलेसह मुलीला मारहाण

Published On: Dec 03 2017 1:43AM | Last Updated: Dec 03 2017 1:15AM

बुकमार्क करा

कल्याण : वार्ताहर

कल्याण पूर्वेकडील गणपती मंदिर परिसरात बसणारी एक भाजी विक्रेती महिला व तिच्या मुलीला पैशांसाठी मारहाण करत मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. मारहाण करणारे मनसेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप पीडित महिलेने केला असून याप्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी चार जणांविरोधात खंडणी व विनयभंगाचा गुन्हा  दाखल करत तिघांना अटक केली. विकास जाधव असे मारहाण करणार्‍या व्यक्‍तीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेरिवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्याला पैसे न दिल्याने त्याने भाजी विक्रेती महिला व तिच्या मुलीला मारहाण केल्याची घटना घडली. सदर महिला कल्याण पूर्व कोळशेवडी गणपती मंदिर परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ती या परिसरात भाजी विक्री करत असताना मनसे कार्यकर्ता जाधव तेथे आला, त्याने भाजी विकणार्‍या महिलेस या जागेवर बसून भाजी विकू नकोस. जागा आमची आहे. भाजी विकायची असल्यास त्या बदल्यात पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. जाधवकडून महिलेकडे वारंवार पैशाची मागणी केली जात होती. पैसे देण्यास नकार दिल्याने तिला आणि तिच्या मुलीला जाधवने मारहाण केली, असा आरोप महिलेसह तिच्या मुलीने केला आहे.या मारहाणीचा मोबाईल व्हिडिओ वायरल झाला आहे. याबाबत महिलेने कोळशेवाडी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी विकासच्या विरोधात खंडणी मागणे, विनयभंग करणे या दोन आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून जाधवसह दोघांना अटक केली.