Thu, Apr 25, 2019 15:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाचशे उठाबशा काढणारी विजया चालू लागली

पाचशे उठाबशा काढणारी विजया चालू लागली

Published On: Dec 19 2017 8:50PM | Last Updated: Dec 19 2017 8:50PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

शिक्षिकेने ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्यामुळे अत्यवस्थ झालेल्या विजया चौगुलेवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून, तिचे पाय थरथरणे पूर्णपणे थांबले आहे. परंतु, अद्यापही तिला पूर्णपणे चालता येत नाही. धरून-धरून ती चालू शकते. त्यामुळे आणखीन काही दिवस तिच्यावर केईएम रुग्णालयातच उपचार सुरू राहणार आहेत.

कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रूक येथील भावेश्वरी संदेश विद्यालयात आठवीत शिकणार्‍या विजयाला ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्यानंतर तिची प्रकृती बिघडली होती. सुरुवातीला तिला कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, नंतर कोल्हापूरहून मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी आणले गेले. केईएममध्ये ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे विजयाच्या वडिलांनी अखेर सुटकेचा निःश्वास टाकला आहे. त्यांच्या मनावरील मोठे दडपण कमी झाले आहे.

तिचे वडील निवृत्ती चौगुले म्हणाले की, ‘कोल्हापूरमधील डॉक्टरांच्या मदतीने मुंबईत आलो . याठिकाणी सुद्धा डॉक्टरांनी चांगले सहकार्य केले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होऊन तिचे पाय कापणे आता पूर्णपणे थांबले आहे.  विजया आता धरून-धरून चालतेही. अवघ्या काही दिवसात विजयाच्या प्रकृतीत होत असलेल्या सुधारणेमुळे आम्ही खूश आहोत’.

‘विजयाच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून तिचे पाय थरथरणे थांबले आहे. परंतु, सध्या तिला औषधोपचारांवरच ठेवण्यात आले आहे. अजून काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार करण्यात येतील’, असे केईएम रुग्णालयाच्या मेंदूविकार विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. संगीता रावत यांनी सांगितले. 

केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, न्यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे विजयावरील उपचार शक्य झाले. औषधांसह न्यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या मदतीने तिचे समुपदेशन सुद्धा सुरूच आहे. दोन दिवस आम्ही पाहणार आहोत, त्यानंतर तिला घरी कधी सोडायचे याबाबतचा निर्णय घेऊ.

केईएमचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर म्हणाले, 'गेल्या चार दिवसांपासून विजया केईएममध्ये उपचार घेत आहे. उपचारासाठी दाखल करतेवेळी ती पूर्णपणे भेदरलेली होती. तिच्या तब्येतीत आता चांगली सुधारणा झाली आहे. मेंदू संबंधित व काही स्नायूंच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. या अहवालात तिला आता कोणताही त्रास नसल्याचे समोर आले आहे. मात्र सध्या तिच्यावर औषधोपचार सुरू असून अजून दोन दिवस तिच्यावर उपचार सुरुच राहतील.'