Mon, Aug 19, 2019 13:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलीची छेड काढल्याचा जाब विचारणार्‍या मातेवर तलवारहल्ला

मुलीची छेड काढल्याचा जाब विचारणार्‍या मातेवर तलवारहल्ला

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 31 2018 12:47AMमुंबई : प्रतिनिधी

मुलीची छेड काढणार्‍यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या 35 वर्षीय महिलेवर चार जणांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोवंडीच्या बैंगणवाडीमध्ये उघडकीस आली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या महिलेवर सायन रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी विनयभंगासह गंभीर दुखापत आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत.

बैंगणवाडीतील चिखलवाडीमध्ये 35 वर्षीय महिला कुटुंबासोबत राहते. तीची 16 वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी येथील सार्वजनिक शौचालयात जात होती. त्यावेळी तीची वाट अडवून मुन्ना आणि झिंगा नावाच्या दोन टवाळखोर तरुणांनी तीची छेड काढली. रात्रीच्यावेळी आपल्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर मुलगी प्रचंड घाबरली. तीने कसेबसे घर गाठून घडलेला प्रकार आईच्या कानावर घातला. मुलीची छेड काढल्याने संतापलेल्या या मातेने याठिकाणी जाऊन दोन्ही टवाळखोरांना जाब विचारला. यातून वाद विकोपाला जाऊन मुन्ना आणि झिंगा याने त्याचे साथिदार मेहताब आणि सद्दाम यांच्या मदतीने तिच्यावरच तलवारीने प्राणघातक हल्ला केला. 

महिलेवर हल्ला झाल्याचे बघून मदतीसाठी स्थानिकांनी धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या शिवाजीनगर पोलिसांनी तीला तात्काळ उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारांनतर तीचा जबाब नोंदवून घेत याप्रकरणी चारही आरोपींविरोधात गंभीर दुखापतीसह, महिलेच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी विनयभंग आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.