Sun, May 26, 2019 14:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तरुणीला लोकलमधून ढकलले

चोरट्याने तरुणीला लोकलमधून ढकलले

Published On: Dec 04 2017 1:58AM | Last Updated: Dec 04 2017 1:58AM

बुकमार्क करा

नवी मुंबई : प्रतिनिधी 

नेरूळ - जुईनगरदरम्यान लोकलच्या महिला डब्यात घुसून एका चोरट्याने ऋतूजा बोडके या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मोबाईल, पर्स आणि कानातील रिंगा खेचून तिला बाहेर ढकलून दिल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी डब्यामध्ये रेल्वे पोलीस अथवा होमगार्ड उपस्थित नसल्याचे उघडकीस आले. 

जुईनगर येथील ऋतूजा सीवूडमध्ये रेल्वेत चढली. मुंबईच्या दिशेला जाणार्‍या डब्यात ती एकटीच होती. चोरटा नेरूळ येथे डब्यात चढल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यात त्याने ऋतूजाचा मोबाईल आणि पर्स हिसकवली. कानातील रिंगाही ओढण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झालेल्या झटापटीत चोरट्याने रिंगा खेचत ऋतूजाला रेल्वेतून धक्का दिला. यावेळी रेल्वे जुईनगर स्थानकात प्रवेश करीत होती. रेल्वेचा वेग कमी झाल्याने खाली पडलेल्या ऋतूजाला फारशी गंभीर दुखापत झाली नाही. मात्र तिच्या डोक्याला लागले असल्याने तिच्यावर वाशीच्या एमजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. 

रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या साह्याने आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान हा विषय येत्या अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.