होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जिओचा आता गिगा फायबर ब्रॉडबँड धमाका

जिओचा आता गिगा फायबर ब्रॉडबँड धमाका

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 06 2018 1:30AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

देशातील दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणणार्‍या रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी ‘जिओ’ या नव्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. यू-ट्यूब, व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकचे ‘इनबिल्ट’ अ‍ॅप हे नव्या फोनचे वैशिष्ट्य असून, येत्या 15 ऑगस्टपासून जिओच्या ग्राहकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. जिओ क्रांतीचे नवे पर्व जाहीर करताना अंबानी यांनी जिओच्या गिगा फायबर ब्रॉडबँड सेवेची घोषणा करीत देशभरातील केबल नेटवर्कची मृत्युघंटा वाजवली. त्याचवेळी फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनसारख्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांवर हल्‍लाबोल चढवण्याचे संकेत दिले. 

रिलायन्सची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी मुंबईत पार पडली. त्यात अंबानी यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी ईशा यांनी या सभेत जिओच्या नव्या उत्पादनांचे सादरीकरण केले.इंटरनेटचा वापर करणार्‍या नागरिकांसाठी रिलायन्सने आता खुशखबर आणली आहे. रिलायन्सतर्फे ‘जिओगिगाफायबर’ ही ब्रॉडबँड सेवा घराघरात देण्याची घोषणा केली आहे. ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानावर आधारित या सेवेमुळे ब्रॉडबँडच्या क्षेत्रामध्ये केवळ क्रांतीच होणार नाही, तर आतापेक्षा कमी दरात वेगवान इंटरनेट सेवा मिळेल अशी अपेक्षा आहे, अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. 

गिगा फायबर ब्रॉडबँड सेवा

रिलायन्स जिओ सध्या गिगा फायबर ब्रॉडबँड सेवेची 10 हजार घरांत चाचणी घेत आहे. ही सेवा 15 ऑगस्ट रोजी सुरु केली जाणार असून, इच्छुक ग्राहक या सेवेसाठी कंपनीच्या माय जिओ अ‍ॅप तसेच जिओ डॉट कॉमच्या माध्यमातून नोंदणी करु शकतात. सर्वाधिक नोंदणी असलेल्या भागात जिओ गिगा फायबर सर्वात आधी मिळणार आहे. जिओ गिगा फायबरला स्वत:चा राऊटर असणार आहे. जिओ गिगा फायबर ग्राहकांना टीव्ही सेट टॉप बॉक्सचा पर्यायही मिळेल. त्याला जिओ गिगा टीव्ही असे नाव देण्यात आले आहे. ते जिओ फोन प्रमाणेच व्हॉईस कमांडला सपोर्ट करेल. जिओ गिगा टीव्हीला स्मार्ट रिमोटही देण्यात आला असून, कॅमेरा जोडल्यास ग्राहक सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून व्हीडिओ कॉलिंगही करता येईल. ग्राहकांना आपला टीव्ही प्रोग्रामिंग नेव्हीगेट करता येईल. जिओ फायबर लाईन इन्स्टॉलेशनसाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही. सुरक्षा ठेव म्हणून जिओ काही शुल्क आकारणार आहे का, याबाबत कंपनीने काहीही स्पष्ट केलेले नाही. जिओ गिगाफायबरच्या किमतीबाबतही काहीही सांगण्यात आलेले नाही. 15 ऑगस्टच्या आसपास यासंबंधीचा खुलासा करण्यात येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

रिलायन्स ऑनलाईन कॉमर्समध्येही

ऑनलाईन किरकोळ विक्री क्षेत्रातही जोरदार आगमन करण्याचा रिलायन्स उद्योगसमूहाचा मानस आहे. यासाठी रिलायन्स रिटेल लिमिटेड आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड यांचा यात समावेश असणार आहे. या माध्यमातून वॉलमार्ट आणि अ‍ॅमेझॉन या कंपन्यांनाही तगडी स्पर्धा निर्माण होणार आहे. ऑनलाईन कॉमर्स क्षेत्रात विकासाची सर्वाधिक संधी आहे, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.