होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घाटकोपरच्या धाराणी आणि गांधी कुटुंबावर शोककळा

घाटकोपरच्या धाराणी आणि गांधी कुटुंबावर शोककळा

Published On: Dec 30 2017 1:47AM | Last Updated: Dec 30 2017 1:03AM

बुकमार्क करा
घाटकोपर : वार्ताहर

कमला मिल कंपाऊंड  येथील हॉटेलला लागलेल्या आगीत घाटकोपर पश्चिमच्या कविता पीयूष धाराणी (36) आणि तेजल भावेन गांधी (36) या बहिणींना आपला जीव गमवावा लागला. सात नातेवाइकांना घेऊन त्या हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. नव वर्षाच्या स्वागतासाठी सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंब 31 डिसेंबरला पाचगणीला जाणार होते. याचे नियोजन करण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र अचानक  आग लागली आणि यामध्ये दोघींचाही मृत्यू झाला.

दरम्यान त्यांचे इतर सात नातेवाईक बाहेर पडले. यात शेफाली धाराणी (41), मेघना ठक्कर (42), रचना त्रीकमणी (41), स्नेहा धाराणी(17), निशा शहा(39), श्वेता शहा(39) दिती ठक्कर(20) यांचा समावेश आहे. यातील स्नेहा धाराणी हिचा हात आगीत होरपळला असून तिला केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर घाटकोपर मधील जॉय या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन्ही बहिणींच्या मृत्यूने धाराणी आणि गांधी कुटुंबासह घाटकोपर पूर्व परिसरात शोककळा पसरली. 

घाटकोपर पूर्वेला 60 फूट रस्त्यावर असलेल्या भावेश्वर शिखर 1 क्रमांक या इमारतीत  तेजल भावेन गांधी या आपल्या कुटुंबासह अनेक वर्षांपासून राहत होत्या. त्यांची सासू आशा हर्षद गांधी यांना मेंदूच्या आजाराने ग्रासले आहे. त्यांचे सर्व आजारपणातील देखभाल त्या गेल्या 14 वर्षांपासून करीत होत्या. आम्ही आमची सून नाही तर मुलगी गमावली आहे. आमच्या घरची ती कॅप्टन होती. एक हाती तिने सगळा संसार सांभाळला होता. तिची उणीव कधीच भरून येणार नाही, अशी प्रतिक्रिया तिचे सासरे हर्षद गांधी यांनी व्यक्त केली. तेजल यांना  10 वषार्ंची मुलगी आहे. तर दुसरीकडे याच विभागात काही अंतरावर असलेल्या 90 फूट रस्त्यावरील इंद्रलोक इमारतीत कविता धाराणी आपल्या कुटुंबासह राहत होत्या. धाराणी कुटुंब घाटकोपर पूर्वमधील प्रसिद्ध कुटुंब आहे. परंतु एकाच वर्षात त्यांच्या कुटुंबाला हा दुसरा मोठा धक्का बसला. कविता धाराणी यांच्या पतीचा छोटा भाऊ आशिष धाराणी यांची व्यावसायिक वादातून काही महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. या धक्क्यातून त्यांचे कुटुंब सावरत असतानाच त्यांना हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये शोककळा पसरली.

तेजल या कविता यांच्या आत्याची मुलगी होती. त्यांच्यात बहिणीचे नाते तर होतेच; परंतु त्या चांगल्या मैत्रिणीही असल्याचे समजते. त्यांचे नातेवाईक निमेश शहा म्हणाले, पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्री सगळे आमच्या दुःखात सहभागी होतील, परंतु अशा घटना घडू नये यासाठी प्रशासन काही कारवाई करणार का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.