Mon, Jun 17, 2019 18:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गंगा गोज्रेश्वर, वासुंद्री व महाकालेश्वर मंदिरात भक्तांचा शिवगजर 

गंगा गोज्रेश्वर, वासुंद्री व महाकालेश्वर मंदिरात भक्तांचा शिवगजर 

Published On: Feb 13 2018 1:28PM | Last Updated: Feb 13 2018 1:27PMटिटवाळा : प्रतिनिधी

महाशिवरात्रीनिमित्त कल्याण ग्रामीण भागांतील अनेक गावांत  तसेच टिटवाळा परिसरात असलेल्या अनेक शिवमंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी  होती. टिटवाळा नजीकच्या वासुंद्री गावातील पेशवेकालीन शिवमंदिरात त्याचप्रमाणे वासुंद्री नदीकिनारी यावर्षी नव्याने बांधण्यात आलेल्या महाकालेश्वर शिवमंदिरातही शिवभक्तांची मांदियाळी पाहवयास मिळाली. गंगागोज्रेश्वर  मढ येथे हे देवस्थान पांडवकालीन असून याठिकाणी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ,बदलापूर, भिवंडी आदी ठिकाणांहून भाविक भक्त येत असतात.  रात्री बारा वाजल्या नंतर काळू नदीच्या पात्रात स्नान करून शिवभक्तांनी शिवशंकराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तर येथील अनेक शिवमंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

वासुंद्री गावातील पेशवेकालीन शिवमंदिरात पहाटे पाच वाजल्यापासून दर्शनास प्रारंभ झाला.या मंदिरात अडीच ते तीन हजार भाविक हजेरी लावत असतात. पाचवा मैल येथे असलेल्या शिवमंदिरातही  शिवभक्तांच्या हरहर महादेवच्या जयजयकाराने मंदिर परिसर निनादत होता. वासुंद्री पेशवेकालीन मंदिर व गणेशघाट महाकालेश्वर मंदिर येथे येणा-या भाविकांसाठी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष रुपेश भोईर यांच्यावतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. उद्योजक विजय पाटील यांच्यावतीने भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. तसेच उपवासाच्या फराळाचे वाटप करण्यात आले.