होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बनावट नोटा बनवणार्‍या टोळीचा पर्दाफाश

बनावट नोटा बनवणार्‍या टोळीचा पर्दाफाश

Published On: Mar 06 2018 1:50AM | Last Updated: Mar 06 2018 12:36AMउल्हासनगर : वार्ताहर

उल्हानगरात 100 रुपयांच्या बनावट नोटा बनवणार्‍या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मिता हरि मलानी (47) व राकेश इसरानी (32) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी पोलिसांनी अटक केली आहे. पूर्वाश्रमीचा रिक्षाचालक असलेला राकेश हा मलानी यांना अवघ्या 4 हजार रुपयात शंभर रुपयांच्या 100 नोटा देत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. हे काम इसरानी हा हॅवलेट पॅकार्ड कंपनीच्या प्रिंटरच्या सहाय्याने करीत होता.

उल्हासनगर कॅम्प 2 येथील गजानन मार्केटमध्ये मिता ऊर्फ हरि मलानी ही महिला बनावट नोटा वटवण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-4 चे पोलीस नाईक रामदास मिसाळ यांना मिळाली होती. त्यांनी एक महिलेला मध्यस्थी ठेवून मिता हिच्याकडून सात हजार रुपयात शंभरच्या नोटांचे दहा हजारांचे बंडल मिळविले. ते तपासले असता सर्वच्या सर्व नोटा बोगस असल्याचे समोर आले. ही बाब मिसाळ यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना सांगितली. त्यांनी सापळा रचून काशामल पुतळ्याजवळ 11 हजाराच्या नोटांसह मिता या महिलेला ताब्यात घेतले. या नोटा राकेश इसरानी याने तिला दिल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सेक्शन 18 परिसरातून राकेशला ताब्यात घेतले.

या कारवाईबाबत माहिती देण्यासाठी गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की 100 रूपयाच्या बनावट नोटा इसरानी घरी तयार करीत होता. यासाठी तो ग्लोसी पातळ कागद वापरत होता. हॅवलेट पॅकार्ड कंपनीच्या डेस्कजेट जी टी 5811 या प्रिंटरच्या सहाय्याने दोन कागदांवर मागे आणि पुढे प्रिंट मारून गमच्या सहाय्याने चिकटवले जायचे. 

आरबीआयचे नाव असलेली सदृश्य 

हिरवी रंगाची चिकटपट्टी लावून मिताला बाजारात चालवण्यासाठी राकेश देत असे. मिता ही नोटा चालविण्यासाठी अन्य महिलांना देत असे. तसेच या नोटा ग्रामीण भागात चालविण्याचा दबाव मिता या महिलांवर टाकत असे. मिता ही जुगार चालविताना पकडली गेली होती.