Mon, Mar 25, 2019 05:28
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार 

अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार 

Published On: Aug 16 2018 12:43PM | Last Updated: Aug 16 2018 12:43PMमुंबई : प्रतिनिधी

भारताचे माजी क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, संघप्रशिक्षक, संघटक अशा विविध भूमिका वाडेकर समरसून जगले. १९७१च्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमधील देदिप्यमान यशाचे श्रेय वाडेकर यांनाच दिले जाते. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा वाडेकर, मुले प्रसाद, विपुल मुलगी कश्मिरा असून मुलगा विपुल आज रात्री अमेरिकेहून येणार आहे. 

बुधवारी रात्री ९.३०च्या सुमारास त्रास जाणवू लागल्याने वाडेकर यांना वरळी येथील त्यांच्या निवासस्थानाहून जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्यांची प्राणज्योत मालवली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. 

अजित वाडेकर यांच्या जाण्याने क्रिकेटच्या क्षितिजावरील आणखी तारा निखळला आहे, अशी भावना भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली. तर महान फलंदाज, यशस्वी कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या भरीव योगदानामुळे अजित वाडेकर नेहमीच स्मरणात राहतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही वाडेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

उद्या दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १० :०० वाजता, त्यांच्या स्पोर्ट्सफिल्ड अपार्टमेंट, वरळी सी फेस येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार असून त्यानंतर दुपारी १२:०० वाजता दादर येथील विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय अनील जोगळेकरांनी सांगितले.