Fri, Jan 18, 2019 19:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुरुदास कामत अनंतात विलीन

गुरुदास कामत अनंतात विलीन

Published On: Aug 24 2018 1:22AM | Last Updated: Aug 24 2018 12:55AMमुंबई / कुर्ला : वार्ताहर  

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्यावर चेंबूरच्या चरई स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी दीड वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती.  गुरुदास कामत याचे पुत्र डॉ.सुनील कामत यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

कामत यांच्या निधनाचे वृत्त समजताच चेंबूरमध्ये शोककळा पसरली होती. त्यांच्या चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळील गौरीनंदन बंगल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धाव घेतली. बुधवारी रात्री  दहा वाजता चेंंबूर येथील निवासस्थानी पार्थिव आणण्यात आले. गुरुवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत  अंत्यदर्शन घेण्यासाठी  पार्थिव ठेवण्यात आले होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 11 वाजता अंत्यदर्शन घेतले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता,  खासदार नारायण राणे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी खासदार एकनाथ गायकवाड, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार तारसिंग, अमीन पटेल, भाई जगताप, राम कदम, प्रसाद लाड, अबू आझमी, खासदार किरीट सोमय्या,  काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त उपस्थित होते.

गौरीनंदन बंगला ते चेंबूरनाका येथील चरई स्मशानभूमी दरम्यान अंत्ययात्रा काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या ट्रकवर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते.  ठिकठिकाणी पार्थिवावर पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.