Fri, Apr 19, 2019 12:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चादर घेतली म्हणून मित्राची दगडाने ठेचून हत्या

चादर घेतली म्हणून मित्राची दगडाने ठेचून हत्या

Published On: Mar 06 2018 11:55AM | Last Updated: Mar 06 2018 11:55AMमुंबई : प्रतिनिधी

थंडीमुळे मित्राची अंगावरील चादर घेतली म्हणून दिपक चव्हाण या 40 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच मित्राने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. हत्येप्रकरणी अक्षय नाडर याला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिपक आणि अक्षय हे काही वर्षांपासून एकमेकांच्या परिचित असून बेरोजगार आहेत. या दोघांनाही दारु आणि ड्रग्ज सेवन करण्याचे व्यसन होते. रात्रीच्या वेळेस ते दोघेही कांदिवलीतील आदुकिया रोडवरील निवासी स्टोरसमोरील फुटपाथवर झोपत होते.

20 फेब्रुवारीला या दोघांनी मद्यप्राशन केले आणि फुटपाथवर झोपले. थंडीमुळे या दोघांमध्ये चादर देण्या-घेण्यावरुन वाद झाला होता. रागाच्या भरात अक्षयने दिपकच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. कांदिवली पोलिसांनी जखमी अवस्थेत दिपकला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फरार असलेल्या अक्षयला शनिवारी पोलिसांनी अटक केली. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.