होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या डीपीमध्ये मोकळ्या जागा अबाधित

मुंबईच्या डीपीमध्ये मोकळ्या जागा अबाधित

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 1:52AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईचा विकास आराखडा तयार करताना छाननी समितीमार्फत प्रत्येक आरक्षणावर स्वतंत्र विचार करण्यात येत आहे. यामध्ये मुंबईतील मोकळ्या जागांना कोणताही धक्का लागणार नाही. विकास आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून मार्चअखेर विकास नियंत्रण नियमावलीसह तो जाहीर केला जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.
मुंबईच्या विकास आराखड्यात यापूर्वी ज्या ठिकाणी खेळाचे मैदान, उद्यान यासाठी जी आरक्षणे टाकण्यात आली होती. त्या ठिकाणी ज्या जागा मोकळ्या असतील त्या नव्या आराखड्यात देखील तशाच राहतील. एखाद्या आरक्षित ठिकाणी जर सद्या अन्य कारणासाठी जागेचा प्रत्यक्ष वापर केला जात असेल तर त्या ठिकाणी शहराच्या आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येईल, असे राज्यमंत्री पाटील यांनी मुंबईवरील चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना सांगितले. 

विमानतळ परिसरातील इमारतींच्या उंचीवर मर्यादा असल्याने पुनर्विकास करताना त्या ठिकाणी एफएसआयचा वापर करता येत नाही. त्यांना टी.डी.आर. स्वरुपात लाभ देण्याचा विचार आहे. मुंबईतील नद्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील पावसाचे पाणी जलद वाहून जाण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील वाहतुकीच्या समस्येचा सर्वंकष अभ्यास करून टप्प्या-टप्प्याने प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबईतील मेट्रो रेल्वेचे काम 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कोस्टल रोड योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मलनिस्सारण पद्धतीमध्ये सुधारणा करणे गरजेचे असून याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच  फेरीवाला क्षेत्रासंदर्भात 20 सदस्यांची समिती नेमली आहे. सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.

Tags : Mumbai, Mumbai news, free space, remain, uninterrupted, DP Mumbai,