ठाणे : खास प्रतिनिधी
पंतप्रधान आवास योजना, मुख्यमंत्री आवास योजनेतून घर मिळणार अशी बतावणी करून, युक्तीने लाभार्थ्यांना घराबाहेर काढून घरातून सोन्याचे दागिणे लंपास करणार्या तुकाराम लाला अडसुळ ( वय 41) या आरोपीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ठाणे, पालघर, नवी मुंबईतील तब्बल 19 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 37 गुन्ह्यांमधील तब्बल दोन किलो सोन्याचे दागिणे, सोन्याची लडीसह 47 लाख 20 हजार 600 रूपयांचा माल हस्तगत करण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डये यांनी दिली.
आरोपी अडसुळ हा नवी मुंबईतीच्या घणसोली गांवातील असून त्याला तांत्रिक माहितीच्या आधारे जेरबंद करण्यास कळवा पोलिसांना यश आले. या आरोपीने पंतप्रधान आवास योजना तसेच मुख्यमंत्री आवास योजनेच्या नावाखाली 37 जणांची फसवणूक केली. कमी किंमतीमध्ये सरकारतर्फे घरे मिळत असल्याने सहजपणे लोक त्याच्या जाळ्यात अडकत होते. तुम्हाला सरकारी योजनेतून घर मिळणार असून तुम्ही कागदपत्रांसह संबंधित विभागातील मुख्य चौक, शासकीय कार्यालयाचे जवळ या, असे सांगून तो लाभार्थ्याला घराबाहेर काढायचा. त्याची खात्री पटल्यानंतर तो संबंधिताच्या घरी जात असे. घरात कुणी असेल तर त्यांच्याकडून पुन्हा इतर कागदपत्रांची मागणी करून त्याच्या झेरॉक्स मागायचा. घरात कुणी नाही याची खात्री झाल्यावर सर्व दागिणे चोरून पोबारा करायचा. या त्याच्या युक्तीला तब्बल 37 जण बळी पडले. त्यापैकी कळवा, मुंब्रा, शिळडायघर,कापुरबावडी, कासारवडवली, भिवंडी, नारपोली, डोंबिवली (मानपाडा), कोळसेवाडी, उल्हासनगर (हिललाईन), अंबरनाथ, बदलापूर, पालघर जिल्ह्यातील वालीव पोलीस ठाणे, नवी मुंबईतील नेरूळ, कळंबोली, सीबीडी बेलापूर, तूर्भे, एनआरआय सागरी, कोपरखैरणे येथील 19 पोलीस स्थानकात 37 गुन्हे दाखल झाले आहेत.
नवी मुंबईतील ज्वेलर्स नरेश उर्फ नारायणसिंह धनसिंह खरवड, रमेश उर्फ गंगासिंग भोरसिंह खरवड, करणसिंह गंगासिंह सिसोदिया यांच्याकडून पोलिसांनी चोरलेले दागिणे हस्तगत केले आहेत.