Sun, May 26, 2019 00:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डेटिंगच्या जाळ्यात अडकला...साडेबारा लाखांना मुकला

डेटिंगच्या नादात साडेबारा लाखांना मुकला

Published On: Jun 03 2018 1:35AM | Last Updated: Jun 03 2018 1:35AMमुंबई : अवधूत खराडे

डेटिंग साईटच्या माध्यमातून सुंदर मुलींना भेटण्याची हौस भागविण्यासाठी दादरमधील 41 वर्षीय बाईलवेड्या बँक अधिकार्‍याने तब्बल 12 लाख 55 हजार गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह एका तरुणाविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन दादर पोलीस तपास करत आहेत.

दादरच्या न्यू प्रभादेवी रोड परिसरात 41 वर्षीय बँक अधिकारी त्याच्या कुटुंबासोबत राहतो. 21 तारखेला मोबाईलवर त्याने पॉपअप ओपन केले. त्यावर असलेल्या साईटवर क्लिक करताच अनेक लिंक आणि साईट ओपन झाल्या. आकर्षक दिसत असलेल्या या साईटपैकी एका डेटिंग साईटवर उत्सुकतेपोटी या बँक अधिकार्‍याने आपली सर्व वैयक्तीक माहिती भरली. थोड्याच वेळात गोड आवाजात बोलत असलेल्या तानिया नावाच्या तरुणीचा फोन आला. एका सुंदर तरुणीशी कॉफी शॉप किंवा रेस्टॉरंटमध्ये भेट, तसेच डेटिंग घडवून आणणार असल्याचे तिने सांगितले.

सुंदर तरुणीला भेटण्यासाठी आधी तीन इन्स्टॉलमेंटमध्ये 3 लाख 40 हजार रुपये कंपनीकडे जमा करावे लागणार आहेत. हे पैसे रिफंडेबल आहेत. गोड आवाजात बोलत असलेल्या तानियाच्या बोलण्याला भुललेल्या या अधिकार्‍याने पैसे भरण्यास होकार दर्शविला. बँक अधिकारी आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच तानियाने एक ईमेल पाठवून पैसे भरण्यासाठी बँक खात्याची माहिती दिली. सुंदर तरुणीशी डेटिंग करण्याची संधी मिळणार असल्याने या अधिकार्‍याने 23 तारखेला 1 लाख भरले. पैसे भरताच मिनी नावाच्या तरुणीचा फोन आला. तिने कॉन्फरन्स कॉलवर आणखी एका तरुणीशी त्याचे बोलणे करुन दिले.

डेटिंगविषयी बोलणार्‍या तरुणीनेही गोड बोलून अधिकार्‍याला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढले. राहावेसे न झाल्याने अधिकार्‍याने दोन दिवसांतच 1 लाख 20 हजार रुपये भरले. पैसे भरताच आणखी सुंदर तरुणींच्या फोटोसह प्रलोभने दाखविणारा मेल आला. त्यात रिफंडेबल 5 लाख 24 हजार रुपयांची स्कीम होती. याला भुलून अधिकार्‍याने 28 तारखेला 2 लाख 20 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात भरले. मात्र ठरल्यावेळेत तरुणीची भेट न झाल्याने दुसर्‍या दिवशी अधिकार्‍याने मेल करुन प्रोफाईल डिलीट करण्याची विनंती या कंपनीकडे केली.

मला यातून बाहेर पडायचे आहे. असे या अधिकार्‍याने ई-मेल करून कळवताच ऋषी नावाच्या तरुणाने फोन केला. प्रोफाईल डिलीट करणेसाठी तुम्हाला 3 लाख 25 हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. अधिकार्‍याने त्याला नकार दिला. तुमने पैसे नही भरा, तो आपको बुरी तरह फसाऐंगे. आपने कुछ नही किया, फिर भी हम लोगोंको पुलीस स्टेशन मै पैसे देना पडता है, पुलिस से फाईल क्लीअरन्स करना पडता है, आप का नाम पुलीस के पास गया है, अशी भीती घातल्याने हा अधिकारी घाबरला. 

घाबरलेल्या अधिकार्‍याकडून या ठगांनी पैसे उकळण्यास सुरुवात केली आणि हा अधिकारी एनईएफटीव्दारे पैसे भरत गेला. त्याने सुंदर मुलीसोबत डेटिंग करण्याच्या हौसेपोटी तब्बल 12 लाख 55 हजार रुपये गमावले होते. धीर गोळा करत या अधिकार्‍याने अखेर दुसर्‍या दिवशी पत्नीच्या कानावर ही बाब घातली आणि दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. फसवणूक करणार्‍यांनी पैसे भरण्यासाठी दिलेले बँक खात्यांचे तपशील, केलेले फोन आणि पाठविलेल्या ई-मेलच्या आधारे आरोपींचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.