Fri, Nov 16, 2018 00:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केळव्याला नालासोपार्‍याचे चौघे बुडाले

केळव्याला नालासोपार्‍याचे चौघे बुडाले

Published On: Jun 17 2018 7:25PM | Last Updated: Jun 17 2018 7:25PMकेळवे : वार्ताहर

केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोकादायक दादरापाडा समुद्रकिनार्‍यावर नालासोपार्‍याच्या संतोष भुवन येथून वर्षा सहलीसाठी आलेल्या चार तरुणांचा रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. यापैकी दीपक परशुराम चालवडी या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. 

संतोष भुवन येथील 15 ते 20 वयोगटांतील 7 मुले  रविवारी वर्षा सहलीसाठी केळव्यात आली. दुपारी अडीजच्या सुमारास  सर्व जण पोहोण्यास गेले असता दीपक परशुराम चालवडी (20), दीपेश पेडणेकर (17), श्रीतेज नाईक (15 ) आणि तुषार चिपटे (15) या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला, तर गौरव भिकाजी सावंत (17), संकेत सचिन जोगले (17) आणि देविदास रमेश जाधव (16) हे तरुण  सुदैवाने बचावले. दीपक चालवडीचा मृतदेह आढळून आला, तर दीपेश, श्रीतेज आणि तुषार यांचे मृतदेह शोधण्याची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

केळवे ग्रामपंचायतीचे लाईफगार्ड वेळेत उपलब्ध न झाल्यानेच या पर्यटकांना वाचवता आले नाही. ग्रामपंचयतीने पर्यटकांकडून प्रवेशशुल्क आकारणी करून दोन लाईफगार्डची नेमणूक केली आहे. मात्र या गार्डनी  पर्यटकांची सुरक्षा पाहणे सोडून सुरुच्या बागेत दुकाने थाटली आहेत, असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे.