Mon, Aug 19, 2019 07:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडूपमध्ये १६ विद्यार्थ्यांना विषबाधा 

भांडूपमध्ये १६ विद्यार्थ्यांना विषबाधा 

Published On: Aug 16 2018 2:55PM | Last Updated: Aug 16 2018 3:13PMमुंबई : प्रतिनिधी

भांडूपमध्ये १६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. सह्याद्री विद्यामंदिर शाळेतील हे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेलाही विषबाधा झाल्‍याची माहिती मिळाली आहे. या सर्वांना मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अग्रवाल रुग्णालयाच्या सीएमओ डॉ. गायश्री पाटील यांनी सांगितलं की, “सह्याद्री विद्यामंदिर शाळेतील मुलांना विषबाधा झाली असल्याचा आम्हाला फोन आला होता. या सर्वांना पोटात मळमळ आणि उलट्या होत होत्या. त्यानुसार दुपारी 12 वाजल्यापासून मुलं रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. आतापर्यंत 16 मुलांना रुग्णालयात आणण्यात आलं असून, एका शिक्षिकेचाही समावेश आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे”

“सकाळी ११ वाजता या शाळेतील मुलांना जेवणात डाळ आणि खिचडी देण्यात आली होती. जेवणानंतर अर्ध्या तासानं मुलांच्या पोटात दुखू लागलं, त्यांना उलट्या होऊ लागल्या. प्राथमिक माहितीनुसार, या मुलांना विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे. पण शाळेत दिलेल्या डाळ आणि खिचडीतूनच ही विषबाधा झाली असावी हे स्पष्ट सांगता येत नाही.’’ असंही डॉ. पाटील यांनी सांगितलं.
पालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, “या मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळाली. त्यांना तातडीनं अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यात 16 लहान मुलांचा समावेश आहे. 

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या गोवंडी भागातील महापालिकेच्या संजयनगर उर्दु शाळेतील मुलांनाही विषबाधा झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा भांडुप येथील एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांनाही विषबाधा झाली आहे.