Sun, Jul 21, 2019 07:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुडालेल्या तरंगत्या हॉटेलचा मुक्काम चार दिवस समुद्रातच

बुडालेल्या तरंगत्या हॉटेलचा मुक्काम चार दिवस समुद्रातच

Published On: May 27 2018 1:47AM | Last Updated: May 27 2018 1:47AMमुंबई : प्रतिनिधी

वांद्रे-वरळी सी लिंकजवळ बुडालेले फ्लोटिंग क्रूझ बाहेर काढण्यासाठी किमान चार दिवस लागणार आहेत. फ्लोटिंग क्रूझ बाहेर काढण्याची प्रक्रिया खूप अवघड असून ही जबाबदारी एआरके डेकच्या मालकांनी एका परदेशी कंपनीवर टाकली आहे. त्यानुसार या कंपनीकडून फ्लोटिंग क्रूझ बाहेर काढण्यासाठी किमान चार दिवस लागणार असल्याची माहिती क्रूझ रेस्टॉरंटच्या तीन मालकांपैकी एक विक्रांत चांदवडकर यांनी दिली आहे.

वांद्रे-वरळी सी लिंकजवळील एआरके डेकचं तरंगते हॉटेल अर्थात फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट शुक्रवारी दुपारच्या दरम्यान अचानक समुद्रात बुडाले. कामगारांना बाहेर काढेपर्यंत रात्र झाली आणि अंधारात क्रूझ बाहेर काढण्याचे काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे शनिवारी सकाळी क्रूझ बाहेर काढण्यात येईल, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.शनिवारी सकाळी सागरी पोलीस, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सहाय्याने ते बाहेर काढण्यात येणार होते. मात्र त्यांना यश आले नाही. बाहेर काढल्यानंतर चार महिन्यांनी हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही चांदवडकर यांनी सांगितले.

चार महिन्यांसाठी राहणार होते बंद 

काही महिन्यांपूर्वीच एआरके डेक फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट सुरू करण्यात आले होते. आलिशान असे तीन मजली हे क्रूझ रेस्टॉरंट वांद्रे-वरळी सी लिंकजवळ होते. अल्पावधीत ते मुंबईकरांच्या पसंतीस उतरले होते. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या नियमानुसार 25 मेपासून पुढचे चार महिने अर्थात पावसाळा संपेपर्यंत फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट बंद ठेवावे लागते. त्यानुसार 25 मेपासूनच ते ग्राहकांसाठी बंद करण्यात आले होते.

भाऊचा धक्क इथे नेताना दुर्घटना

चार महिन्यांसाठी फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट बंद राहणार असल्याने क्रूझ भाऊचा धक्का इथे हालवण्यात येणार होते. हीच तयारी सुरू असताना शुक्रवारी दुपारी अचानक वादळ आणि भरती आली आणि जेट्टीला लावलेला अँकर निसटला, त्यामुळे क्रूझ दगडाला आपटली.आणि खालचा भाग फुटून त्यातून पाणी क्रूझमध्ये गेले नि क्रूझ बुडाली. फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट बंद झाल्याने त्यावेळी त्यात केवळ 13 कामगार होते. त्यांना त्वरित बाहेर काढण्यात सागरी पोलीस, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाला यश आल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

परदेशी कंपनी क्रूझ काढणार बाहेर 

क्रूझ बाहेर काढण्याची जबाबदारी एआरके डेककडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सॉलवेज या कंपनीला देण्यात आली आहे. या कंपनीच्या एक्सपर्टनी शनिवारी सकाळपासूनच क्रूझची आणि परिस्थितीची पाहणी केली. त्यानुसार कंपनीचे एक्सपर्ट समुद्रात जाऊन क्रूझचा कुठला भाग फुटला आहे ते शोधून काढतील. त्यानंतर या भागाची दुरुस्ती करून पंपाच्या सहाय्याने क्रूझमधील पाणी बाहेर काढण्यात येईल. पाणी काढल्याबरोबर क्रूझ पाण्यावर तरंगेल आणि मग क्रूझ किनार्‍याला आणणे शक्य होईल. मात्र या प्रक्रियेला चार दिवस लागणार आहेत.